बुकेऐवजी पुस्तके द्या! मनपा आयुक्त अमोल येडगे यांचे आवाहन; ६१ पुस्तके केली दान
महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचनालये सुरू करण्याचा उपक्रम; पुस्तक दानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. १६ :- विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने पुस्तक दान उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी स्वतः ६१ पुस्तके दान करून या उपक्रमात सहभाग नोंदविला.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आयुक्त अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचनालये सुरू करण्यात येणार आहेत. पुस्तक दान उपक्रमातून संकलित होणारी पुस्तके या वाचनालयांमध्ये ठेवण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे.
मनपा मुख्यालयात आयुक्त अमोल येडगे यांनी मराठी भाषेतील ४० आणि इंग्रजी भाषेतील २१, अशी एकूण ६१ पुस्तके दान केली. शिक्षण विभागाच्या वतीने संकलित पुस्तकांचे मराठी, इंग्रजी आणि उर्दू भाषांनुसार वर्गीकरण करण्यात येत आहे.
महानगरपालिकेच्या विविध कार्यक्रमांमध्ये बुके देण्याऐवजी विविध विषयांवरील पुस्तके भेट द्यावीत. त्यामुळे ही पुस्तके विद्यार्थ्यांच्या वाचनालयात उपलब्ध होतील आणि त्यांना ज्ञान मिळविण्याची संधी मिळेल, असे आवाहन आयुक्त अमोल येडगे यांनी यावेळी केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, मुख्य लेखा परीक्षक शिवाजी नाईकवाडे, उपआयुक्त अपर्णा थेटे, अंकुश पांढरे, सविता सोनवणे, अभय प्रामाणिक, सहायक आयुक्त लता पुजारी, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद, अधीक्षक दीपक जावळे, रवींद्र खरात, अतुल बनकर, करण साळवे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित