पदवीधर निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज! आठ जिल्ह्यांचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

२३ ऑक्टोबरला मतदान; ८४२ केंद्रांवर ३ लाख २६ हजार ७०१ मतदार बजावणार हक्क

पदवीधर निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज! आठ जिल्ह्यांचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २१ :- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान प्रक्रिया निर्भय, सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.

शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी त्यांनी ऑनलाइन बैठकीद्वारे विभागातील आठही जिल्ह्यांच्या निवडणूक तयारीचा आढावा घेतला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश होता.

मतदान केंद्रांवरील सुविधांची तपासणी

मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, मतदारांसाठी आवश्यक व्यवस्था, मतदान साहित्याची उपलब्धता, अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच मतदान केंद्रांच्या परिसरात राजकीय पक्षांच्या बूथ व्यवस्थेसाठी करण्यात आलेल्या नियोजनाचीही माहिती घेण्यात आली.

मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रवेश व्यवस्था, दिशादर्शक सूचना आणि आवश्यक सुविधांची खातरजमा करण्यावर भर देण्यात आला. मतदान साहित्याचे वितरण, मतपेट्यांची सुरक्षित वाहतूक, मतदानानंतर मतपेट्या जमा करण्याची व्यवस्था तसेच मतमोजणी केंद्रावरील तयारीबाबतही जिल्हा प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या.

४१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आठ जिल्ह्यांतील एकूण ३ लाख २६ हजार ७०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी संपूर्ण विभागात ८४२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, निवडणुकीच्या रिंगणात ४१ उमेदवार आहेत.

शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवून मतदान करायचे असल्याने मतदारांना योग्य पद्धतीने मतदान करण्याबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

संभाव्य अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. मतदानाच्या दिवशी उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणींवर तातडीने उपाययोजना कराव्यात आणि सर्व यंत्रणांमध्ये योग्य समन्वय राखावा, असे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिले.

आठही जिल्ह्यांतील प्रशासन मतदानासाठी सज्ज झाले असून, आता शुक्रवारच्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित