जळगावच्या केळी उत्पादकांसाठी दुष्काळी पीकविम्याची मागणी; रक्षाताई खडसेंचा शासनाकडे आग्रह
नाशिक महसूल विभागातील पीक परिस्थितीचा आढावा; व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभाग
नाशिक/जळगाव, दि. २४ :- महाराष्ट्रातील नाशिक महसूल विभागातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज कृषी मंत्री दत्तात्रय विठोबा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेत जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले.
या बैठकीस मंत्री गिरीश महाजन, नरहरी झिरवळ, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांच्यासह विविध जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान रक्षाताई खडसे यांनी जळगाव जिल्ह्यात भूजलाची कमतरता निर्माण झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या अडचणी मांडल्या. दुष्काळी परिस्थितीमुळे केळी पिकाचे नुकसान झाल्यास त्याला पीकविमा संरक्षण मिळावे, अशी मागणी त्यांनी केली.
यापूर्वी झालेल्या चर्चांमध्ये विमा कंपन्यांनी केळी पिकाचा दुष्काळी विमा संरक्षणात समावेश करण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली होती. त्यामुळे या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी खडसे यांनी बैठकीत केली.
तसेच केळी पीकविमा प्रक्रियेत येणाऱ्या जिओ-टॅगिंग आणि पोर्टलमधील तांत्रिक अडचणी दूर करणे, वर्षभर सुरू असलेल्या केळी लागवडीला केवळ एका हंगामापुरते मर्यादित न ठेवता व्यापक विमा संरक्षण देणे आणि पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई विनाविलंब मिळवून देणे, या मुद्द्यांचाही त्यांनी पाठपुरावा केला.
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना योग्य पीकविमा संरक्षण तसेच नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला जाईल, अशी भूमिका रक्षाताई खडसे यांनी यावेळी मांडली.
महाराष्ट्र वाणी
सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित