छत्रपती संभाजीनगरच्या शेख फरहान फैसलची विभागीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड
मौलाना आझाद महाविद्यालयाच्या फरहानने विभागीय निवड चाचणीत छाप पाडली; यशाबद्दल महाविद्यालयासह कुटुंबीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. १० :- शहरातील मौलाना आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इयत्ता अकरावीत शिक्षण घेणाऱ्या शेख फरहान फैसल (वय १९ वर्षे) याने क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनअंतर्गत २०२६-२७ या वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर विभागीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघात त्याची निवड झाली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित विभागीय निवड चाचणीत फरहानने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात प्रभावी कामगिरी केली. त्याच्या खेळातील कौशल्याची दखल घेत त्याची संघासाठी निवड करण्यात आली. त्याचा खेळाडू ओळख क्रमांक AURDIV-2324-007722 असून, जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून त्याचे ओळखपत्र जारी करण्यात आले आहे.
फरहानला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असून, या आवडीला त्याने मेहनत आणि सरावाची जोड दिली. त्याच्या निवडीमुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशाबद्दल मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मगदूम फारुकी, प्रा. मोहम्मद शोएब सिद्दीकी, शेख अख्तर आणि अकबर खान यांनी फरहानचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
फरहानचे वडील शेख फैसल मोहम्मद इकबाल हे बीबी का मकबरा, औरंगाबाद येथील मुतवल्ली असून, ते मुतवल्ली मशाइख खिदमत ट्रस्ट (महाराष्ट्र)चे संस्थापक अध्यक्ष आहेत. फरहानच्या या यशाबद्दल त्याचे वडील, मोठे काका शेख मोहम्मद अफजल, मोठा भाऊ शेख फहाद मुजावर, नाना शेख गुलाम कादिर, आई शेख सलमा, आत्या शेख आसिया, शेख समीना व रुबीना शेख, मामा शेख मोबीन, शेख मुन्तजीर, शेख मतीन आणि शेख मोईन यांनी आनंद व्यक्त केला.
तसेच मित्र दानिश कासमानी, नुमान शेख, फैज शेख आणि सुफियान यांनीही फरहानचे अभिनंदन केले. त्याने भविष्यात क्रिकेटमध्ये आणखी मोठे यश संपादन करावे आणि शहराचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा सर्वांकडून व्यक्त करण्यात आल्या.
फरहानच्या निवडीमुळे मौलाना आझाद महाविद्यालयासह छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अखलाख देशमुख - महाराष्ट्र वाणी