राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेत ढोरेगावच्या कुणाल जाधव, सुमेरा शेख यांची चमकदार कामगिरी!
जिल्हास्तरावर द्वितीय व तृतीय क्रमांक; तालुकास्तरावरही जिल्हा परिषद शाळेच्या सात विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २१ :- महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धा २०२६ मध्ये ढोरेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची छाप उमटवली आहे. या स्पर्धेच्या जिल्हास्तरीय निकालात कुणाल संदीप जाधव याने द्वितीय, तर सुमेरा शब्बीर शेख हिने तृतीय क्रमांक पटकावला. याशिवाय तालुकास्तरावर शाळेच्या सात विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.
कुणालला एक हजार, तर सुमेराला ५०० रुपयांचे पारितोषिक
स्पर्धेच्या ‘क’ गटात (इयत्ता पाचवी ते सातवी) कुणाल संदीप जाधव याने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून एक हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. तर ‘ड’ गटात (इयत्ता आठवी ते दहावी) सुमेरा शब्बीर शेख हिने तृतीय क्रमांक मिळवत ५०० रुपयांचे पारितोषिक मिळवले. दोन्ही विद्यार्थ्यांनी चित्रकलेतील कल्पकता, निरीक्षणशक्ती आणि सर्जनशीलतेच्या जोरावर हे यश संपादन केले.
तालुकास्तरावर सात विद्यार्थ्यांची बाजी
तालुकास्तरीय स्पर्धेतही ढोरेगावच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
‘क’ गट (इयत्ता तिसरी ते चौथी)
- प्रथम क्रमांक : कौसर मोईन शेख
- द्वितीय क्रमांक : नयना संतोष कांबळे
‘क’ गट (इयत्ता पाचवी ते सातवी)
- प्रथम क्रमांक : कुणाल संदीप जाधव
- द्वितीय क्रमांक : अनिकेत सोमनाथ पठाडे
‘ड’ गट (इयत्ता आठवी ते दहावी)
- प्रथम क्रमांक : सुमेरा शब्बीर शेख
- द्वितीय क्रमांक : शामल शंकर शिंदे
- तृतीय क्रमांक : कल्याणी संदीप जाधव
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाली नवी ओळख
बालचित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, निरीक्षणशक्तीला आणि कलात्मक अभिव्यक्तीला चालना देणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. रंग आणि रेषांच्या माध्यमातून आपल्या भावना व विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता विकसित होते. या स्पर्धेतील यशामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळाले असून, ग्रामीण भागातील मुलांमध्येही विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करण्याची क्षमता असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन
या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खलील पटेल, उपाध्यक्ष अशोक कांबळे व सर्व पदाधिकारी, सरपंच रजियाबी अयुब पटेल, गटशिक्षणाधिकारी अरविंद कापसे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिलकुमार सकदेव, केंद्रप्रमुख सचिन डमाळे, केंद्रीय मुख्याध्यापिका अंजली पुऱ्हे, राजेश हिवाळे, दत्तात्रय आडेप, सुमती काळगे तसेच पालक आणि ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पुढील शैक्षणिक व कलात्मक वाटचालीसाठी शुभेच्छाही व्यक्त केल्या.
विद्यार्थ्यांच्या या यशासाठी पदवीधर शिक्षक मनोज घुले, शंकर राऊत, दिलीप धर्माधिकारी, भाऊसाहेब गाढवे, नीलिमा कुलकर्णी, मुग्धा निमसे, परमेश्वर मस्के, सचिन पाटसकर, शामीर शेख, अली बाकोदा आणि कल्याणी जगताप यांनी परिश्रम घेतले.
ढोरेगावच्या या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांच्या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित