गणेशमूर्ती विक्रीतून ‘उमेद’च्या महिलांची 6 कोटी 31 लाखांची उलाढाल! जिल्ह्यात 253 स्टॉलवर 1 लाख 17 हजार 170 गणेशमूर्तींची विक्री
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १६ :- गणेशोत्सव 2026च्या पार्श्वभूमीवर ‘उमेद’ स्वयंसहायता समूहातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या गणेशमूर्ती विक्री उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात ग्राम, तालुका आणि जिल्हा पातळीवर उभारण्यात आलेल्या 253 स्टॉलमधून तब्बल 1 लाख 17 हजार 170 श्री गणेशमूर्तींची विक्री करण्यात आली. या विक्रीतून 6 कोटी 31 लाख 43 हजार 927 रुपयांची उलाढाल झाली.
या उपक्रमामुळे स्वयंसहायता समूहातील महिलांना गणेशमूर्ती विक्रीच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारा हा उपक्रम ठरला आहे.
तालुकानिहाय विक्रीतून मिळालेली रक्कम
जिल्हा परिषद मैदान : 84 लाख 88 हजार 118 रुपये
छत्रपती संभाजीनगर तालुका : 78 लाख 46 हजार 190 रुपये
गंगापूर : 81 लाख 91 हजार 037 रुपये
कन्नड : 99 लाख 71 हजार 074 रुपये
खुलताबाद : 34 लाख 41 हजार 283 रुपये
पैठण : 80 लाख 27 हजार 300 रुपये
फुलंब्री : 29 लाख 05 हजार 570 रुपये
सिल्लोड : 62 लाख 32 हजार 625 रुपये
सोयगाव : 20 लाख 83 हजार 510 रुपये
वैजापूर : 59 लाख 57 हजार 220 रुपये
अशा प्रकारे सर्व केंद्रांमधून मिळून 6 कोटी 31 लाख 43 हजार 927 रुपयांची विक्री झाली.
प्रशासनाच्या नियोजनातून उपक्रमाला यश
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक वासुदेव सोळंके यांच्या नियंत्रणाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले.
तालुका पातळीवर गटविकास अधिकारी, तर जिल्हा पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांच्या समन्वयातून गणेशमूर्ती विक्री केंद्रांची व्यवस्था करण्यात आली. जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर, जिल्हा व्यवस्थापक विपणन सचिन सोनवणे, जिल्हा व्यवस्थापक बिभीषण भोईटे, जिल्हा व्यवस्थापक सुचिता खोतकर, जिल्हा व्यवस्थापक प्रज्ञा दाभाडे यांच्यासह जिल्हा व तालुका पातळीवरील अभियान व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी योगदान दिले.
स्वयंसहायता समूहातील महिलांनीही विक्री प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत हा उपक्रम यशस्वी केला. महिलांच्या या कामगिरीचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. आणि वासुदेव सोळंके यांनी कौतुक केले.