अवैध पिस्तूल तस्करी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी ३ पिस्तूल आणि ९ जिवंत काडतुसे जप्त; आतापर्यंत ७ पिस्तूल हस्तगत

अवैध पिस्तूल तस्करी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी ३ पिस्तूल आणि ९ जिवंत काडतुसे जप्त; आतापर्यंत ७ पिस्तूल हस्तगत

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २५ :- शहरात अवैध अग्निशस्त्र बाळगण्याच्या प्रकरणाचा तपास सुरू असताना सिडको पोलिसांनी आणखी मोठी कारवाई केली आहे. अटक आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन व्यक्तींकडून एकूण ३ पिस्तूल आणि ९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या अग्निशस्त्रांची संख्या ७, तर जिवंत काडतुसांची संख्या २० वर पोहोचली आहे.

दोन व्यक्तींकडून शस्त्रसाठा जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम धर्मराज वाळके (वय २६, रा. सावित्री नगर, हिमायत बाग, उद्धवराव पाटील शाळेजवळ) याच्याकडून २ पिस्तूल आणि ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. शुभम हा मिनरल वॉटर बॉटल निर्मितीच्या व्यवसायात असल्याची माहिती आहे.

तसेच कृष्णा विष्णू अधाने (वय २९, रा. गोळेगाव, ता. खुलताबाद) याच्याकडून १ पिस्तूल आणि ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. कृष्णा हा गोळेगाव येथे कपड्यांचे दुकान चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आतापर्यंत ७ पिस्तूल आणि २० काडतुसे जप्त

अवैध अग्निशस्त्र प्रकरणाच्या तपासात सिडको पोलिसांनी केलेल्या या ताज्या कारवाईत ३ पिस्तूल आणि ९ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. यापूर्वीच्या कारवाईसह आतापर्यंत एकूण ७ पिस्तूल आणि २० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

शहरात अवैध अग्निशस्त्रांचा पुरवठा नेमका कुठून होत आहे, या शस्त्रांमागे आणखी कोणाचे संबंध आहेत आणि या प्रकरणाचे जाळे किती मोठे आहे, हे तपासातून स्पष्ट होणार आहे. सिडको पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित