बळीराजा संकटात; कर्नाटकने दुष्काळ जाहीर केला, महाराष्ट्र ५ ऑक्टोबरची वाट का पाहतोय? आमदार रोहित पवार
मुंबई दि १९ :- कर्नाटक सरकारने 28 ऑगस्ट रोजी राज्यातील 101 तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. त्यानंतर 17 सप्टेंबर रोजी आणखी 23 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून, कर्नाटकातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या आता 124 झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातही खरीप हंगाम पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे संकटात सापडला असून अनेक भागांतील शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारने दुष्काळ जाहीर करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
रोहित पवार यांनी म्हटले की, केंद्र सरकारच्या VEDAS उपग्रहाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाची तूट आणि दीर्घ पावसाचा खंड दिसून येत आहे. त्यामुळे दुष्काळाचे निकष लागू होत असतील तर निर्णय घेण्यासाठी आणखी प्रतीक्षा का केली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
"कर्नाटक सरकार दुष्काळ जाहीर करून केंद्राकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवू शकते, तर महाराष्ट्र सरकार 5 ऑक्टोबरची वाट का पाहत आहे?" असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला.
राज्यात 5 ऑक्टोबरपासून दुष्काळी स्थितीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार हे पंचनामे NDRFच्या निकषांनुसार करण्यात येणार आहेत. मात्र, दुष्काळ जाहीर करण्यासाठी 5 ऑक्टोबरचीच प्रतीक्षा करण्याची गरज आहे का, असा मुद्दा रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीही राज्यातील पावसाच्या तुटीच्या पार्श्वभूमीवर तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली असून शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 50 हजार रुपयांच्या मदतीसह विविध उपाययोजनांची मागणी केली आहे.
"परतीच्या पावसात थोडाफार पाऊस झाला तर दुष्काळ जाहीर करण्याची गरज भासणार नाही आणि सरकारचा पैसा वाचेल, असा विचार केला जात असेल तर तो शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक ठरेल," असा आरोपही रोहित पवार यांनी केला.
खरीप हंगामातील पिकांचे नुकसान, वाढता आर्थिक ताण आणि पुढील काळातील पाणी व चारा टंचाईची शक्यता लक्षात घेता सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
— अखलाख देशमुख | महाराष्ट्र वाणी
सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित