सिल्लोडमध्ये २०,५०९ मतदारांना निवडणूक आयोगाच्या नोटिसा; कागदपत्रांसह सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश
सिल्लोड दि २५ :- विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील तब्बल २० हजार ५०९ मतदारांना निवडणूक आयोगाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष सुनावणीस उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रक्रियेत मतदारसंघातील ५ हजार ८८६ अनमॅपिंग तसेच १५ हजार ९४१ एन्युमरेशन प्रकरणांतील मतदारांचा समावेश आहे. एकूण २१ हजार ८२७ मतदारांची प्रकरणे तपासणीच्या कक्षेत असून, उर्वरित मतदारांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू आहे.
निवडणूक आयोगाने संबंधित मतदारांना आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले आहे. नोटीस मिळाल्यानंतर पुरावे सादर न केल्यास किंवा निर्धारित सुनावणीला गैरहजर राहिल्यास संबंधित मतदाराचे नाव अंतिम मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे.
ही कागदपत्रांची छाननी आणि प्रत्यक्ष सुनावणीची प्रक्रिया २३ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने १० अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
मतदारांनी नोटिसेकडे दुर्लक्ष न करता निर्धारित वेळेत संबंधित अधिकाऱ्यांसमोर आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित