पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी कशी होणार? ७० टेबलांवर १३ फेऱ्या; सकाळी ८ वाजता सुरुवात

पहिल्या पसंतीच्या मतांपासून सुरुवात; कोटा पूर्ण न झाल्यास पुढील पसंतीक्रमानुसार मतांचे हस्तांतरण

पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी कशी होणार? ७० टेबलांवर १३ फेऱ्या; सकाळी ८ वाजता सुरुवात

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २६ :- मराठवाड्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. प्राथमिक मतमोजणीसाठी ७० टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून, एकूण १३ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, पसंतीक्रमानुसार मतांची मोजणी आणि मतांचे हस्तांतरण करावे लागणार असल्याने अंतिम निकालासाठी अधिक वेळ लागू शकतो.

आठ जिल्ह्यांतील १.९१ लाख मतदारांनी बजावला हक्क

२३ ऑक्टोबर रोजी विभागातील आठ जिल्ह्यांमधील ८४२ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. प्राथमिक आकडेवारीनुसार, एकूण १ लाख ९१ हजार ६८९ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ५८.६७ इतकी असून, निवडणुकीच्या रिंगणात ४१ उमेदवार आहेत. आता या उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे.

सकाळी ७.३० वाजता स्ट्राँग रूम उघडणार

मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी सकाळी ७ ते ७.१५ या वेळेत मतमोजणी कक्षात उपस्थित राहतील. सकाळी ७.३० वाजता उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम उघडण्यात येईल. त्यानंतर मतपेट्यांचे टेबलनिहाय वितरण केले जाईल. सकाळी ८ वाजता गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होईल. याचवेळी टपाली मतपत्रिकांची मोजणीही सुरू करण्यात येणार आहे.

प्रत्येकी २५ मतपत्रिकांचे गठ्ठे

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक मतपेटीवरील सील तपासले जाईल. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष मतपेट्या उघडून त्यातील मतपत्रिकांची संख्या संबंधित मतदान केंद्राच्या हिशेबाशी पडताळली जाईल.

त्यानंतर प्रत्येकी २५ मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करून सर्व मतपत्रिकांची सरमिसळ केली जाईल. पुढील तपशीलवार मोजणीसाठी प्रत्येक टेबलवर एक हजार मतपत्रिका दिल्या जातील. ८४२ मतदान केंद्रांतील मतपेट्यांच्या प्राथमिक मोजणीसाठी १३ फेऱ्या होतील. तेराव्या फेरीत केवळ दोन मतदान केंद्रांतील मतपेट्यांची मोजणी केली जाणार आहे.

पहिल्या पसंतीच्या मतांपासून मोजणीला सुरुवात

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पसंतीक्रम पद्धतीने होत असल्याने मतमोजणीची प्रक्रिया इतर निवडणुकांपेक्षा वेगळी असते. सर्वप्रथम प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या पहिल्या पसंतीच्या वैध मतांची मोजणी केली जाईल. त्यानंतर एकूण वैध मतांच्या आधारे निवडून येण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा निश्चित केला जाईल.

पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोणत्याही उमेदवाराने आवश्यक कोटा पूर्ण केला नाही, तर सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवाराला नियमानुसार निवडणूक प्रक्रियेतून वगळण्यात येईल. त्याच्या मतपत्रिकांवरील पुढील उपलब्ध पसंतीक्रमानुसार उर्वरित उमेदवारांना मतांचे हस्तांतरण केले जाईल.

अंतिम निकालासाठी लागणार अतिरिक्त वेळ

आवश्यक कोटा पूर्ण होईपर्यंत किंवा निवडणूक नियमांनुसार निर्णय होईपर्यंत मतमोजणी आणि मतांचे हस्तांतरण ही प्रक्रिया सुरू राहील. त्यामुळे प्राथमिक मतमोजणीच्या १३ फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही अंतिम निकालासाठी अतिरिक्त वेळ लागू शकतो.

संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आवश्यक पडताळणी आणि निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी अंतिम निकाल जाहीर करतील.

आता उत्सुकता निकालाची! ४१ उमेदवारांपैकी कोण बाजी मारणार आणि पसंतीक्रमाच्या मतमोजणीत कोणाला फायदा होणार, याकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित