केसर लॉन क्रिकेट स्पर्धेत शेख फरहानचा धुमाकूळ! ७६ चेंडूंत १२१ धावा

केसर लॉन क्रिकेट स्पर्धेत शेख फरहानचा धुमाकूळ! ७६ चेंडूंत १२१ धावा
केसर लॉन क्रिकेट स्पर्धेत शेख फरहानचा धुमाकूळ! ७६ चेंडूंत १२१ धावा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १६ :- मिटमिटा येथील ग्रीन चिली ग्राउंडवर सुरू असलेल्या ‘केसर लॉन सीजन १’ क्रिकेट स्पर्धेत अलिना सीसी संघाचा फलंदाज शेख फरहान फैसल याने आक्रमक फलंदाजी करत शानदार शतक झळकावले. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर अलिना सीसी संघाने २१२ धावांची मोठी धावसंख्या उभारली. या उत्कृष्ट कामगिरीसाठी फरहानला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

१४ ऑक्टोबर रोजी अलिना सीसी आणि न्यू स्टार या संघांमध्ये झालेल्या सामन्यात फरहानने अवघ्या ७६ चेंडूंत १२१ धावा फटकावल्या. त्याच्या खेळीत १५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याने १५९.२१ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर दबाव निर्माण केला.

फरहानला अहमद बाटुक याने दमदार साथ दिली. बाटुकने केवळ २६ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. या दोघांच्या आक्रमक फलंदाजीमुळे अलिना सीसी संघाला मोठी धावसंख्या उभारता आली. शेख असदने १८, सिकंदर भाईने ८, तर अज्जू लालाने ७ धावांचे योगदान दिले.

गोलंदाजांची भेदक कामगिरी; न्यू स्टारवर दबाव

फलंदाजीनंतर अलिना सीसीच्या गोलंदाजांनीही प्रभावी कामगिरी केली. जहीर भाईने अवघ्या ३ षटकांत ६ धावा देत ५ बळी मिळवले. संघाचा कर्णधार अब्दुल अजीम याने ४ षटकांत १७ धावा देत ३ बळी घेतले, तर मोहम्मद अय्याजने ३ षटकांत १५ धावा देत २ फलंदाजांना बाद केले.

अलिना सीसीच्या फलंदाजांनी उभारलेली मोठी धावसंख्या आणि गोलंदाजांचा भेदक मारा यामुळे न्यू स्टार संघाला मोठे आव्हान पेलताना अडचणींचा सामना करावा लागला. फरहानच्या शतकासह जहीर भाईच्या पाच बळींची कामगिरी सामन्यात विशेष ठरली.

या सामन्यातील फरहानच्या आक्रमक फलंदाजीचे संघ व्यवस्थापनासह उपस्थित क्रिकेटप्रेमींनी कौतुक केले.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित