कप केकमध्ये रबर-प्लास्टिकचे तुकडे आढळल्याची तक्रार; रॉयल बेकर्सचा परवाना निलंबित
अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि अस्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर FDA ची कारवाई; चिकलठाणा एमआयडीसीतील बेकरीला व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १० :- शहरातील बेकरी उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मे. रॉयल बेकर्स अँड कन्फेक्शनर्स येथे तयार होणाऱ्या कप केकमध्ये रबर किंवा प्लास्टिकसदृश तुकडे आढळल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाली होती. यानंतर केलेल्या तपासणीत स्वच्छतेसह अन्न सुरक्षा नियमांच्या पालनात अनेक त्रुटी आढळल्याने प्रशासनाने बेकरीचा परवाना निलंबित केला आहे.
तपासणीत अनेक त्रुटी उघड
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने ७ ऑक्टोबर रोजी संबंधित बेकरीची तपासणी केली. या तपासणीत परिसरातील अस्वच्छतेबरोबरच अन्न सुरक्षा मानकांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले. बेकरीत तयार होणाऱ्या कप केकमध्ये रबर किंवा प्लास्टिकचे तुकडे आढळल्याची तक्रारही या कारवाईच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरली.
तपासणीदरम्यान पिण्याच्या पाण्याचे आणि अन्नपदार्थांचे प्रयोगशाळा तपासणी अहवाल उपलब्ध नसणे, कामगारांकडून स्वच्छतेच्या नियमांचे पालन न होणे, कीटक नियंत्रण व्यवस्थेचा अभाव आणि आवश्यक नोंदी उपलब्ध नसणे, अशा त्रुटी आढळल्याचे समोर आले.
८ ऑक्टोबरपासून परवाना निलंबित
या गंभीर त्रुटींची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने ८ ऑक्टोबरपासून रॉयल बेकर्सचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. निलंबनाच्या कालावधीत बेकरीला कोणताही अन्न व्यवसाय करता येणार नसल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
या कारवाईमुळे बेकरी उत्पादनांची स्वच्छता, गुणवत्ता आणि सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्राहकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना त्यांची गुणवत्ता आणि सुरक्षितता याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे.
— अखलाख देशमुख व ‘महाराष्ट्र वाणी’ टीम