सिल्लोड तालुक्यात दुष्काळाची तीव्रता; गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांची शेतांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी

सिल्लोड तालुक्यात दुष्काळाची तीव्रता; गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांची शेतांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी
सिल्लोड तालुक्यात दुष्काळाची तीव्रता; गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांची शेतांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी

सिल्लोड, दि. २ :- सिल्लोड तालुक्यात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक गावांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (वर्ग-१) रत्नाकर पगार यांनी शुक्रवारी विविध भागातील शेतांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

या पाहणीदरम्यान त्यांनी ग्रामपंचायत अन्वी येथे भेट देऊन ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पिकांची सद्यस्थिती जाणून घेतली.

पावसाअभावी कपाशी, मका, सोयाबीनसह अन्य खरीप पिकांवर मोठा परिणाम झाल्याचे पाहणीमध्ये दिसून आले. अनेक शेतांमध्ये पिके पाण्याअभावी वाळून गेली असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना शासनाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत तसेच संबंधित कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून नुकसानीची नोंद करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, त्या गावांनी टँकरने पाणीपुरवठा तसेच विहीर अधिग्रहणासाठीचे प्रस्ताव तातडीने पंचायत समितीच्या टंचाई विभागाकडे सादर करावेत, जेणेकरून आवश्यक कार्यवाही करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत दुष्काळी कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रामपंचायत अधिकारी गणेश टाकसाळ यांच्यासह स्थानिक शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीची माहिती देत शासनाने तातडीने आर्थिक मदत तसेच पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी केली.

अखलाख देशमुख - महाराष्ट्र वाणी न्यूज