गोवंश तस्करांविरुद्ध ग्रामीण पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’! ३० जनावरांची सुटका; ८.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त

चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धडक कारवाई; ५ गुन्हे दाखल, ७ आरोपींविरुद्ध कारवाई; ७० किलो गोमांसही जप्त

गोवंश तस्करांविरुद्ध ग्रामीण पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’! ३० जनावरांची सुटका; ८.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गोवंश तस्करांविरुद्ध ग्रामीण पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’! ३० जनावरांची सुटका; ८.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि. २७ :- गोवंश तस्करी, अवैध कत्तल आणि जनावरांवरील क्रूरतेविरुद्ध छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. देवगाव रंगारी, फुलंब्री, वडोदबाजार आणि वैजापूर या चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवशी करण्यात आलेल्या कारवायांमध्ये तब्बल ३० गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली, तर विक्रीसाठी ठेवलेले ७० किलो गोमांस जप्त करण्यात आले. या कारवायांत जनावरे, वाहने आणि इतर साहित्य मिळून एकूण ८ लाख २७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच गुन्हे दाखल करून सात आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध कत्तलखान्यांविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे छापे, वाहनांची तपासणी, नाकाबंदी आणि गस्तीद्वारे संशयित हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

देवगाव रंगारीत दोन ठिकाणी छापे; १२ जनावरांची सुटका

देवगाव रंगारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ ऑक्टोबर रोजी दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. पहाटे कुरेशी मोहल्ल्यातील पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने सात गोवंश जनावरे आखूड दोरीने बांधून ठेवल्याचे आढळले. त्यांच्यासाठी चारा-पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी मोसीन मुसा कुरेशी आणि रियाज रौऊफ कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

त्याच दिवशी सायंकाळी गायरान जमिनीवर अशाच प्रकारे ठेवलेली आणखी पाच जनावरे आढळली. या प्रकरणी साहील गफार कुरेशी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. दोन्ही कारवायांत एकूण १२ जनावरांची सुटका करण्यात आली असून, त्यांची अंदाजे किंमत १ लाख ७५ हजार रुपये आहे.

फुलंब्रीत पिकअपमधून जनावरांची वाहतूक; वाहनासह मुद्देमाल जप्त

फुलंब्री ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील हॉटेल लोकमानसमोर बोलेरो पिकअपमधून गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याचे पोलिसांना आढळले. वाहनातून दोन गायी आणि दोन लहान रेडे अशी चार जनावरे ताब्यात घेण्यात आली. याप्रकरणी वाहनचालक ज्ञानेश्वर विठ्ठल मोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

जनावरांची किंमत ७७ हजार रुपये असून, एमएच ०४ एफपी २८२३ क्रमांकाच्या पिकअप वाहनासह एकूण २ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वडोदबाजारमध्ये १४ जनावरे दाटीवाटीने कोंबली

वडोदबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगव्हाण फाटा येथे महिंद्रा मॅक्सिमो वाहनातून गोवंश जनावरांची वाहतूक केली जात असल्याचे आढळले. वाहनात एक गाय आणि १३ वासरे अशी एकूण १४ जनावरे दाटीवाटीने भरलेली होती. जनावरांना आखूड दोरीने बांधण्यात आले होते, तसेच चारा-पाण्याची व्यवस्था नव्हती.

या प्रकरणी शाहिद कासम शहा आणि शेख खालील शेख जिलानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एमएच ०३ एएएच ७८८७ क्रमांकाच्या वाहनासह एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वैजापूरमध्ये ७० किलो गोमांस जप्त

वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गोमांस विक्रीविरोधात कारवाई करताना शफीक मस्जीद कुरेशी याच्याकडून विक्रीच्या उद्देशाने ठेवलेले अंदाजे ७० किलो गोमांस जप्त करण्यात आले. या गोमांसाची किंमत सुमारे ७० हजार रुपये असून, दोन सुरे आणि एक वजनकाटा असा ८०० रुपयांचा इतर मुद्देमालही जप्त करण्यात आला. या प्रकरणी ७० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यंदा आतापर्यंत ३१.२५ कोटींचा मुद्देमाल जप्त

जानेवारी २०२६ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक, अवैध कत्तलखाने आणि गोमांसाशी संबंधित एकूण १७६ गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणांत ३३७ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ७९६ गोवंश जनावरांची सुटका केली, २६ हजार ४५२ किलो गोमांस जप्त केले आणि गुन्ह्यांत वापरण्यात आलेली १२८ वाहने ताब्यात घेतली. या सर्व कारवायांत ३१.२५ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोवंश तस्करी, अवैध कत्तल, जनावरांवरील क्रूरता आणि गोमांसाच्या बेकायदेशीर विक्रीला आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलिसांची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. संशयित ठिकाणांवर छापे टाकून संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित