घातक रासायनिक कचरा रॅकेटचा मास्टरमाईंड जेरबंद; 10 हजारांहून अधिक ड्रमच्या विल्हेवाटीचा धक्कादायक खुलासा
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २९ :- औद्योगिक प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या घातक रासायनिक कचऱ्याची बेकायदेशीर वाहतूक करून त्याची अनधिकृत पद्धतीने विल्हेवाट लावणाऱ्या बहुराज्यीय रॅकेटचा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील फरार मुख्य सूत्रधार इस्तेकार अहमद निसार खान (38) याला सिल्लोड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेलगतच्या भागातून अटक केली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर इस्तेकार खान फरार झाला होता. त्याचा माग काढण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक उत्तर प्रदेशात पोहोचले. पोलिसांची चाहूल लागताच तो वारंवार ठिकाण बदलत होता. मात्र तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या आधारे पोलिसांनी अखेर त्याला ताब्यात घेतले.
अनेक ठिकाणी रासायनिक ड्रम टाकल्याने तपासाला सुरुवात
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यातील पळशी, सिल्लोड, फर्दापूर, आळंद, शिवूर आणि तोंडापूर परिसरात घातक रासायनिक पदार्थांनी भरलेले ड्रम आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. घटनास्थळावरील ड्रम, दूषित माती, वाहनांची ये-जा, संबंधित व्यक्तींचे संपर्क आणि आर्थिक व्यवहार यांचा पोलिसांनी बारकाईने तपास केला.
तपास पुढे सरकत असताना या प्रकरणाचे कनेक्शन महाराष्ट्राबाहेर तेलंगणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशपर्यंत असल्याचे समोर आले.
3.52 लाख लिटर रसायनांसह मोठा मुद्देमाल जप्त
पोलिसांच्या कारवाईत आतापर्यंत 1,601 ड्रममधील 3,52,220 लिटर घातक औद्योगिक रसायन, सुमारे 40 टन रासायनिक पावडर, 50 टन रसायनमिश्रित दूषित माती, तीन ट्रक, एक हायड्रा मशीन आणि सात मोबाईल फोन असा सुमारे 80.35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात इस्तेकार खानसह आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
2005 पासून औद्योगिक कचरा हाताळणीचा अनुभव
पोलिसांच्या तपासानुसार, इस्तेकार खानचा औद्योगिक कचऱ्याच्या व्यवहाराशी जुना संबंध असल्याचे समोर आले आहे. 2005 मध्ये मुंबईतील धारावी येथील एका कंपनीत काम करत असताना त्याला प्लास्टिक कचरा गोळा करून त्यापासून दाणे तयार करण्याच्या प्रक्रियेचा अनुभव मिळाला.
यानंतर त्याने भावासोबत प्लास्टिक डिस्पोजलचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायादरम्यान त्याचे हैदराबादमधील काही व्यक्तींशी संपर्क निर्माण झाले. त्यातून तेलंगणातील VBR Green Environment Pvt. Ltd. तसेच राजस्थानमधील निंबाहेडा येथील 3R Enviro कंपनीशी संबंधित व्यक्तींशी त्याचे संबंध प्रस्थापित झाल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, याच संपर्कांच्या माध्यमातून औद्योगिक प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या घातक रसायनांची अधिकृत पद्धतीने विल्हेवाट न लावता ती बेकायदेशीर मार्गाने टाकण्याची साखळी तयार झाली.
10 महिन्यांत 10 हजारांहून अधिक ड्रम?
ऑगस्ट 2025 च्या सुमारास इस्तेकार खानचा सिल्लोडमधील अब्दुल गफार खान हमीद खान पठाण याच्याशी संपर्क आल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागात रासायनिक कचरा पोहोचवून त्याची बेकायदेशीर विल्हेवाट लावण्याचे काम अधिक सक्रिय झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.
प्राथमिक तपासात मागील 10 ते 12 महिन्यांत 100 पेक्षा अधिक मालवाहू वाहनांमधून रासायनिक कचरा जिल्ह्यात पाठविल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. प्रत्येक वाहनातून 200 लिटर क्षमतेचे सुमारे 100 ड्रम पाठविले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मागील 10 ते 11 महिन्यांत 10 हजारांहून अधिक रासायनिक ड्रम तसेच सोडियम बायकार्बोनेट मिश्रित दूषित माती विल्हेवाटीसाठी पाठविल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
80 लाखांपेक्षा अधिक आर्थिक व्यवहार
रासायनिक कचऱ्याची बेकायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी संबंधितांना वाहनामागे अतिरिक्त मोबदला दिला जात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या संपूर्ण साखळीत 80 लाख रुपयांपेक्षा अधिक आर्थिक व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी मिळवली आहे.
THF, Chloroform आणि Toluene चा धागा
या प्रकरणात राजस्थानमधील निंबाहेडा येथील 3R Enviro कंपनीशी संबंधित असल्याचे दिसणाऱ्या काही घातक रसायनांचा धागाही तपासात समोर आला आहे. जप्त केलेल्या ड्रमवरील लेबलनुसार त्यामध्ये THF, Chloroform आणि Toluene यांसारख्या उच्च जोखमीच्या औद्योगिक सॉल्व्हेंटचा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मात्र या रसायनांची अचूक रासायनिक संरचना शासनमान्य प्रयोगशाळेतील वैज्ञानिक तपासणीनंतरच निश्चित होणार आहे. जप्त रसायने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली मान्यताप्राप्त TSDF, पुणे येथे सुरक्षित विल्हेवाटीसाठी पाठविण्यात आली आहेत.
मास्टरमाईंडच्या चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता
इस्तेकार खानच्या अटकेमुळे संपूर्ण रॅकेटची कार्यपद्धती उघड करण्याच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे. सध्या तो पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून त्याच्याकडून रासायनिक कचऱ्याचा मूळ स्रोत, वाहतूक करणारे वाहनचालक, मध्यस्थ, आर्थिक व्यवहार आणि अंतिम विल्हेवाटीचे ठिकाण याबाबत माहिती घेतली जात आहे.
राजस्थान आणि हैदराबादमधील या साखळीशी संबंधित इतर व्यक्तींचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, पर्यावरण, जलस्रोत, शेती आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या या रॅकेटमधील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. केवळ कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई न करता त्यामागील स्रोत, पुरवठा, वाहतूक, आर्थिक व्यवहार आणि बेकायदेशीर विल्हेवाटीची संपूर्ण साखळी उघड करण्यावर पोलिसांचा भर आहे.