‘गुप्त धन आणि पैशाचा पाऊस’ पडण्याच्या आमिषासाठी प्रतिबंधित दुर्मीळ कासवाची तस्करी; LCBची धडक कारवाई, ५ आरोपी जेरबंद!

छत्रपती संभाजीनगर-सिल्लोड मार्गावरील पाथरी टोलनाक्यावर सापळा; गुजरातसह जळगावातील आरोपी ताब्यात

‘गुप्त धन आणि पैशाचा पाऊस’ पडण्याच्या आमिषासाठी प्रतिबंधित दुर्मीळ कासवाची तस्करी; LCBची धडक कारवाई, ५ आरोपी जेरबंद!

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १४ :- प्रतिबंधित दुर्मीळ कासवाची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या टोळीवर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने कारवाई करत तब्बल पाच आरोपींना जेरबंद केले आहे. पाथरी टोलनाका येथे सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली. आरोपी हे कासव ‘पैशाचा पाऊस’ आणि ‘गुप्त धन’ मिळविण्याच्या आमिषासाठी घेऊन जात असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.

ही कारवाई १३ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार एक संशयित व्यक्ती आपल्या साथीदारांसह छत्रपती संभाजीनगरहून सिल्लोडमार्गे जळगाव जिल्ह्यातील अमळनेरच्या दिशेने इर्टिगा वाहनातून जात असल्याची माहिती होती.

माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने कारवाईसाठी रवाना झाले. वडोदबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथरी टोलनाका येथे पथकाने सापळा रचला.

दरम्यान, माहितीतील MH 05 EA 5248 क्रमांकाचे इर्टिगा वाहन दिसताच पोलिसांनी ते अडवून वाहनातील पाच जणांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले. वाहनाची झडती घेतली असता पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या बरणीत एक जिवंत कासव आढळून आले.

या कासवाबाबत कोणताही वैध परवाना किंवा कागदपत्रे आरोपींकडे नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. वनविभागाकडून करण्यात आलेल्या पडताळणीत हे कासव प्रतिबंधित प्रजातीचे असल्याचे स्पष्ट झाले.

हे पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अख्तर खान शामिन खान पठाण (५२), रा. सुरत, गुजरात

शेख अब्रार अहमद मोहिनुद्दीन शेख (३१), रा. अमळनेर, जि. जळगाव

साबीर खान अहमद खान मेवाती (४५), रा. सारबोटे, ता. अमळनेर

शेख मुख्तार शेख शहाबुद्दीन (३४), रा. अमळनेर

सय्यद अब्रार अली रोशन अली (३४), रा. कासोद, ता. एरंडोल, जि. जळगाव

या प्रकरणी वडोदबाजार पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध वन्यजीव प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रतिबंधित कासव नेमके कुठून आणण्यात आले, त्याची तस्करी करण्यामागील खरे कारण काय होते आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास वडोदबाजार पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत, पोलीस उपनिरीक्षक लहु घोडे यांच्यासह विठ्ठल डोके, विजय धुमाळ, महेश बिरुटे, सनि खरात, संदिप कोळगे, योगेश तरमळे व जिवन घोलप यांच्या पथकाने केली.