“कायदा-सुव्यवस्था आणि जातीय सलोखा राखणे हेच प्राधान्य” — ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २७ :- छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे प्रकाश जाधव यांनी मंगळवारी (२६ मे) अधिकृतपणे स्वीकारली. पदभार स्वीकारताच त्यांनी ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत विविध महत्त्वाच्या सूचना दिल्या. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखणे तसेच जातीय सलोखा अबाधित ठेवणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी आणि विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देत, प्रत्येक भागात शांतता समित्यांच्या बैठका आयोजित करून सर्व धर्मीयांमध्ये समन्वय राखण्याचे निर्देश जाधव यांनी दिले.
आगामी बकरी ईदचा सण शांततेत आणि सामाजिक ऐक्य जपत साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकाश जाधव यांनी केले.
“सजग नागरिक आणि सतर्क पोलिसांच्या समन्वयातूनच सुरक्षित समाज घडतो. ”