'नशामुक्त छत्रपती संभाजीनगर'साठी २ हजार विद्यार्थ्यांची मानवी साखळी; जिल्हाधिकाऱ्यांचे व्यसनमुक्तीचे आवाहन

शहागंज परिसरात जनजागृती रॅली; ५०० विद्यार्थ्यांनी साकारली 'नशामुक्त छत्रपती संभाजीनगर' मानवी रांगोळी

'नशामुक्त छत्रपती संभाजीनगर'साठी २ हजार विद्यार्थ्यांची मानवी साखळी; जिल्हाधिकाऱ्यांचे व्यसनमुक्तीचे आवाहन
'नशामुक्त छत्रपती संभाजीनगर'साठी २ हजार विद्यार्थ्यांची मानवी साखळी; जिल्हाधिकाऱ्यांचे व्यसनमुक्तीचे आवाहन

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. २७ :- जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि सारा नवजीवन बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहागंज परिसरात 'नशामुक्त छत्रपती संभाजीनगर' अभियानांतर्गत भव्य जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.

कार्यक्रमात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्त जीवनाचा संकल्प करण्याचे आवाहन केले. "नशा छोडो, परिवार जोडो – नशा छोडो, भारत जोडो" या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ५०० विद्यार्थ्यांनी 'नशामुक्त छत्रपती संभाजीनगर' ही मानवी रांगोळी साकारली असून तिचे ड्रोनद्वारे चित्रण करण्यात आले.

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पी. एम. मिन्नू यांच्या हस्ते जनजागृती रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

या उपक्रमात समाज कल्याण विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन, महानगरपालिका तसेच विविध शासकीय विभागांचा सहभाग होता. शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर, उपशिक्षणाधिकारी दिपाली थावरे, निता श्रीश्रीमाळ, गीता तांदळे, विस्तार अधिकारी दिलीप सिरसाठ, जालम चौरे, सुनिता वाघ, ज्ञानेश्वर रोडगे आदी उपस्थित होते.

नशामुक्त भारत अभियानाचे मास्टर ट्रेनर डॉ. कृष्णा रामचंद्र भावले यांनी विद्यार्थी व नागरिकांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून समाजात व्यसनमुक्तीचा संदेश दिला.