औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत महायुतीची एकहाती सत्ता; 21 पैकी 19 जागांवर विजय! विरोधकांना फक्त 2 जागा

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत महायुतीची एकहाती सत्ता; 21 पैकी 19 जागांवर विजय! विरोधकांना फक्त 2 जागा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि ५ :- औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCCB) 2026 ते 2031 कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून महायुती समर्थित पॅनलने बँकेवर भक्कम पकड कायम ठेवली आहे. एकूण 21 जागांपैकी तब्बल 19 जागांवर विजय मिळवत महायुतीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले, तर विरोधकांना केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.

निवडणुकीपूर्वी मतदान प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. एकूण 1053 मतदारांपैकी 1048 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे जवळपास 99 टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळे निकालाबाबत उत्सुकता वाढली होती.

प्राथमिक कृषी पतपुरवठा सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून खासदार डॉ. काळे कल्याण वैजनाथराव यांनी 48 मते मिळवत विजय मिळवला. सोयगाव मतदारसंघातून काळे प्रभाकर दयाळराव यांनी 36 मतांसह बाजी मारली. कन्नड मतदारसंघातून जाधव रंजना हर्षवर्धन यांनी 98 मते मिळवत विजय नोंदवला, तर गंगापूर मतदारसंघात जाधव शेषराव भावराव यांनी 49 मते मिळवून प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.

विविध विकास संस्था गटात चुरशीची लढत पाहायला मिळाली. या गटात मंत्री अतुल मोरेश्वर यांनी 267 मते मिळवत सर्वाधिक मते मिळवली, तर शेळके रामराव दादाराव यांना 237 आणि पाटील अर्जुन नितीन यांना 223 मते मिळाली. या मतदारसंघात एकूण 301 वैध मतपत्रिकांची नोंद झाली होती.

महिला राखीव मतदारसंघातही तिरंगी लढत रंगली. आमदार चव्हाण अनुराधा अतुल यांनी 749 मते मिळवत विजय मिळवला. त्यांच्याविरोधात तागंडे मुक्ताबाई श्याम यांना 640, तर पाटील डोंगणावकर निलिमा किरण यांना 513 मते मिळाली.

इतर अनेक मतदारसंघात उमेदवार बिनविरोध निवडून आले. खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड, पैठण, वैजापूर, अनुसूचित जाती-जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील काही जागांवर थेट बिनविरोध निवड झाल्याने निवडणुकीतील चित्र सुरुवातीपासूनच स्पष्ट झाले होते.

निकालानंतर महायुती समर्थकांनी जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला. आता बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

वाचत राहा महाराष्ट्र वाणी – कारण बातमी फक्त वेगवान नाही, तर विश्वासार्हही!