ऊसतोड मजुरांच्या घरातून मुंबई पोलिसांपर्यंत; चार सख्ख्या बहिणींची एकाचवेळी दमदार भरारी!

ऊसतोड मजुरांच्या घरातून मुंबई पोलिसांपर्यंत; चार सख्ख्या बहिणींची एकाचवेळी दमदार भरारी!

महाराष्ट्र वाणी

बीड (प्रतिनिधी) दि ८ :- बीड जिल्ह्यातील जिवाचीवाडी येथील एका सर्वसामान्य ऊसतोड मजूर कुटुंबाने आपल्या मुलींच्या यशाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. हनुमंत चौरे यांच्या उषा, अर्चना, गीतांजली आणि शितल या चार सख्ख्या मुलींची एकाचवेळी मुंबई पोलिस दलात निवड झाली असून त्यांच्या या यशाची सर्वत्र चर्चा होत आहे.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या या बहिणींना शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांच्या आई-वडिलांनी मुलींच्या शिक्षणात कोणतीही तडजोड केली नाही. ऊसतोडणीचे कष्टाचे काम करत मुलींना पुढे जाण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठबळ दिले.

ग्रामीण आणि डोंगराळ भागातील मुलींना अनेक सामाजिक व आर्थिक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. मात्र चौरे भगिनींनी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर या सर्व आव्हानांवर मात करत मुंबई पोलिस दलात स्थान मिळवले.

चारही बहिणींच्या या अभूतपूर्व यशामुळे चौरे कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला असून संपूर्ण बीड जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील अनेक मुलींना शिक्षण आणि करिअरच्या क्षेत्रात मोठी स्वप्ने पाहण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे.

"परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते," हे चौरे भगिनींनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.

अशाच प्रेरणादायी आणि सकारात्मक बातम्यांसाठी वाचत राहा — महाराष्ट्र वाणी!