‘आपदा मित्र’ प्रशिक्षणासाठी अंतिम संधी; इच्छुक स्वयंसेवकांनी २० मे पूर्वी नोंदणी करा!

‘आपदा मित्र’ प्रशिक्षणासाठी अंतिम संधी; इच्छुक स्वयंसेवकांनी २० मे पूर्वी नोंदणी करा!

╔════════════════════════════

║ 📰 महाराष्ट्र वाणी 📰  

╚══════════════════════════

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.१४ :- जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार “अप स्केलिंग आपदा मित्र” योजनेंतर्गत १२ दिवसीय निवासी ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणासाठी इच्छुक स्वयंसेवकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अंतिम बॅच दि. २२ मे रोजी कोलाड, जि. रायगड येथे रवाना होणार आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जनार्दन विधाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णतः मोफत असून सहभागी प्रत्येक ‘आपदा मित्रा’ला वैयक्तिक आपत्कालीन प्रतिसादकर्ता संच (ERK) दिला जाणार आहे. तसेच तीन वर्षांसाठी पाच लाख रुपयांचे विमा संरक्षणही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान प्रवास, निवास आणि भोजनाची संपूर्ण व्यवस्था शासनामार्फत विनामूल्य करण्यात येणार आहे. महिला व मुलींसाठी स्वतंत्र बॅच आणि प्रवासाची विशेष सुविधा देखील उपलब्ध आहे.

प्रशिक्षणासाठी इच्छुक स्वयंसेवकांनी आवश्यक कागदपत्रांसह दि. २० मेपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी करावी. आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, टी.सी. किंवा राष्ट्रीयत्वाचा पुरावा, महाविद्यालयाचे ओळखपत्र, पासपोर्ट फोटो आणि नोकरी करत असल्यास ओळखपत्र यांचा समावेश आहे.

या उपक्रमासाठी अर्जदार भारतीय नागरिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे ठेवण्यात आली असून माजी सैनिक, डॉक्टर, स्थापत्य अभियंते, शास्त्रज्ञ तसेच आपत्कालीन सेवेतून निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ही मर्यादा ५५ वर्षांपर्यंत राहणार आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, आशा व अंगणवाडी सेविका, होमगार्ड, पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, खासगी सुरक्षा रक्षक तसेच विविध शासकीय व निमशासकीय विभागातील कर्मचारी या प्रशिक्षणासाठी पात्र राहणार आहेत.

अधिक माहितीसाठी दीपक उदावंत (मो. ७०५८०१०४५०) किंवा मोहम्मद अर्शी खान (मो. ९९१०७२८४८७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

“आपत्तीच्या काळात मदतीचा हात ठरण्याची ही संधी… ‘आपदा मित्र’ बनून समाजसेवेत सहभागी व्हा!”