“आजपासून ‘नवतपा’चा तडाखा! पुढील 5 दिवस मुलं आणि ज्येष्ठांसाठी धोक्याची घंटा”
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २५ :- राज्यासह देशभरात आजपासून ‘नवतपा’ला सुरुवात झाली असून पुढील पाच दिवस तीव्र उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. हवामान विभागाने 2 जूनपर्यंत कडक उन्हाचा इशारा दिल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी या काळात अधिक सावध राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
दरवर्षी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करताच ‘नवतपा’चा कालावधी सुरू होतो. या नऊ दिवसांत तापमान झपाट्याने वाढत असून वातावरणात उकाडा आणि गरमीची तीव्रता अधिक जाणवत आहे. दिवसासोबतच रात्रीच्या वेळीसुद्धा उष्णतेची लाट कायम राहणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.
डॉक्टरांच्या मते, या काळात मुलांमध्ये डिहायड्रेशन, ताप, थकवा आणि उष्माघाताचा धोका वाढतो. त्यामुळे मुलांना दुपारच्या उन्हात बाहेर जाण्यापासून रोखणे, भरपूर पाणी पाजणे, हलका आहार देणे आणि थेट उन्हापासून दूर ठेवणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांनीही शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे.
तज्ज्ञांनी नागरिकांना शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सैल कपडे, डोक्यावर टोपी किंवा अंगावर ओला कपडा वापरणे फायदेशीर ठरू शकते.
“उन्हाचा तडाखा वाढतोय… स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं आता काळाची गरज बनली आहे!”