"आ. साजिद खान पठाण यांना जीवे मारण्याची धमकी! काँग्रेसची 'Y+' सुरक्षेची जोरदार मागणी"

"आ. साजिद खान पठाण यांना जीवे मारण्याची धमकी! काँग्रेसची 'Y+' सुरक्षेची जोरदार मागणी"
"आ. साजिद खान पठाण यांना जीवे मारण्याची धमकी! काँग्रेसची 'Y+' सुरक्षेची जोरदार मागणी"

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि ८ :- अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याच्या घटनेचा निषेध करत छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने या प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच आमदार साजिद खान पठाण व त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने 'Y+' दर्जाची सुरक्षा आणि एस्कॉर्ट वाहन उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी विभागीय आयुक्तांमार्फत महाराष्ट्र शासन व भारत सरकारकडे करण्यात आली.

शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 7 रोजी विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या जनप्रतिनिधींना अशा प्रकारे जीवे मारण्याच्या धमक्या मिळणे ही अत्यंत गंभीर बाब असून यामुळे केवळ संबंधित लोकप्रतिनिधींच्याच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अशा घटनांमुळे लोकशाही संस्थांवरील नागरिकांचा विश्वास कमी होण्याची शक्यता असून या प्रकरणातील दोषींवर कठोर व निष्पक्ष कारवाई होणे आवश्यक आहे.

काँग्रेसने निवेदनाद्वारे या धमकीमागील संपूर्ण कट उघडकीस आणण्यासाठी सक्षम तपास यंत्रणेमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून आमदार साजिद खान पठाण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने 'Y+' दर्जाची सुरक्षा व एस्कॉर्ट वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा आढावा घेऊन आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. लोकशाही व्यवस्थेत जनप्रतिनिधींची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही शासनाची घटनात्मक जबाबदारी असल्याचे नमूद करत विभागीय आयुक्तांनी महाराष्ट्र शासन व भारत सरकारकडे तातडीने सकारात्मक शिफारस करावी, अशी अपेक्षाही शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने व्यक्त केली.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम, इब्राहिम पठाण, इंजि. विशाल बन्सवाल, मोहम्मद जाकीर, गुलाब पटेल, शेख अथर, ऋषिकेश महाजन, आमेर अब्दुल सलीम, योगेश थोरात, मोईन कुरेशी, साहेबराव बनकर, मोईन इनामदार, अनिस पटेल, मुझफ्फर खान, डॉ. अरुण शिरसाट, सय्यद नदीम सौदागर, शफीक शहा, सय्यद फय्याजोद्दीन, जुल्फिकार खान, शाहजेब खान यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.