पैठण गेटमध्ये अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई! मुदतबाह्य पदार्थांपासून तयार होत होता ज्यूस; साठा तात्काळ नष्ट
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २ :- शहरातील पैठण गेट परिसरात अन्न सुरक्षा विभागाने धडक कारवाई करत एका ज्यूस सेंटरमध्ये गंभीर अनियमितता उघडकीस आणल्या. तपासणीदरम्यान मुदतबाह्य अन्नपदार्थांचा वापर करून ज्यूस तयार केला जात असल्याचे समोर आल्यानंतर संबंधित साठा तात्काळ नष्ट करण्यात आला.
आज (२ जुलै २०२६) अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे यांनी अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत अजिंठेकर, फरीद सिद्दीकी आणि कीर्तिका झाडे यांच्या पथकासह पैठण गेट येथील "मे लकी ज्युस सेंटर"ची तपासणी केली. या कारवाईत संबंधित ठिकाणी अनेक त्रुटी आढळून आल्या.
तपासणीदरम्यान पास्चुराइज्ड होमोजनाइज्ड टोनड दूध आणि अल्फान्सो मँगो पल्पचा मुदतबाह्य साठा ज्यूस बनवण्यासाठी वापरला जात असल्याचे निदर्शनास आले. हा साठा तातडीने जप्त करून नष्ट करण्यात आला. तसेच आईस्क्रीमऐवजी फ्रोझन डेजर्टचा वापर होत असल्याचेही आढळले.
याशिवाय संबंधित ठिकाणी स्वच्छतेबाबतही गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर पैठण गेट परिसरातील "मे फ्रेश ज्युस सेंटर" आणि "न्यू लकी ज्युस सेंटर" येथेही तपासणी मोहीम राबवण्यात आली. संबंधित व्यावसायिकांना स्वच्छता राखण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
ही कारवाई सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या आदेशानुसार आणि सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपासणी अहवालाच्या आधारे पुढील आवश्यक कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तुम्ही पित असलेला ज्यूस खरोखरच सुरक्षित आहे का? हा प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे!