"३.५ तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट परत करून प्रामाणिकतेचा आदर्श; पोलीस आयुक्तांच्या हस्ते ऋषिकेश सातभाई यांचा गौरव"

"३.५ तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट परत करून प्रामाणिकतेचा आदर्श; पोलीस आयुक्तांच्या हस्ते ऋषिकेश सातभाई यांचा गौरव"
"३.५ तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट परत करून प्रामाणिकतेचा आदर्श; पोलीस आयुक्तांच्या हस्ते ऋषिकेश सातभाई यांचा गौरव"

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ७ :- आजच्या काळात हरवलेली मौल्यवान वस्तू प्रामाणिकपणे मूळ मालकापर्यंत पोहोचविण्याच्या घटना क्वचितच घडतात. मात्र छत्रपती संभाजीनगरातील ऋषिकेश प्रदीपराव सातभाई आणि त्यांच्या पत्नी स्नेहा ऋषिकेश सातभाई यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कृतीची दखल घेत शहराचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी त्यांचा विशेष सत्कार करून प्रशंसापत्र प्रदान केले.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ जून २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास जबिंदा पेट्रोल पंप परिसरात सुहास भाले यांचे सुमारे साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट हरवले होते. हे ब्रेसलेट ऋषिकेश सातभाई यांना मिळून आले. मौल्यवान दागिना स्वतःकडे ठेवण्याचा कोणताही मोह न बाळगता त्यांनी जबाबदारीने त्याच्या मालकाचा शोध घेतला आणि सर्व खात्री करून ते ब्रेसलेट सुरक्षितपणे सुहास भाले यांच्याकडे सुपूर्द केले.

या प्रामाणिक कृतीची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी ऋषिकेश सातभाई व स्नेहा सातभाई यांना पोलीस आयुक्तालयात सन्मानपूर्वक निमंत्रित केले. यावेळी त्यांचे कुटुंबीय तसेच सोसायटीतील नागरिक उपस्थित होते. पोलीस आयुक्तांच्या हस्ते ऋषिकेश सातभाई यांना विशेष प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, समाजात विश्वास, सुरक्षितता आणि सामाजिक मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी अशा प्रामाणिक कृती अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक नागरिकाने जबाबदारीची भावना जपत अशा आदर्श वर्तनातून समाजात सकारात्मक संदेश द्यावा, असे त्यांनी नमूद केले.

ऋषिकेश सातभाई यांच्या या प्रामाणिक कृतीचे शहरभर कौतुक होत असून, त्यांच्या वर्तनातून समाजात अजूनही माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा सकारात्मक संदेश मिळत आहे.