अवैध प्राणी वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाचा ‘वॉच’; चेकपोस्ट उभारून भरारी पथकांमार्फत तपासणी करा जिल्हाधिकारी यांचे निर्देश
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि. २६ :- प्राण्यांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात विशेष चेकपोस्ट उभारून भरारी पथकांमार्फत तपासणी करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले. पोलीस विभाग, पशुसंवर्धन विभाग, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, परिवहन, महसूल आणि महानगरपालिका विभाग यांनी संयुक्तपणे कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
तसेच शासन मान्यताप्राप्त कत्तलखान्यांना अचानक भेट देऊन तेथील कामकाज, स्वच्छता आणि इतर बाबींची तपासणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती’च्या (SPCA) आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मा. न्यायाधीश (परिविक्षाधीन) गायत्री रांझे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक राजपूत, पोलीस निरीक्षक एस. व्ही. शहाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजकुमार कुंथले, उप शिक्षणाधिकारी गीता तांदळे, डॉ. रमण इंगळे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. अहमद असरार, डॉ. शाहेद, महानगरपालिका मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर बिडाईत, सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ. जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी बाजारपेठा व इतर ठिकाणी होणारी प्राण्यांची अवैध वाहतूक पूर्णपणे रोखण्यासाठी पोलीस तपासणी नाके अधिक सतर्क ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांविषयी संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी वन विभाग आणि प्राणीमित्र संघटनांच्या माध्यमातून विशेष जनजागृती मोहीम राबविण्याचेही सांगितले.
प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, महसूल, पशुसंवर्धन विभाग आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही बैठकीत करण्यात आले.
“प्राण्यांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रशासन अधिक सतर्क झाले असून, अवैध वाहतुकीवर आता कडक नजर ठेवली जाणार आहे.”