१५५ जोडप्यांचा एकाच मंचावर निकाह! सिल्लोडमध्ये ‘इज्तेमाई शादीया’चा भव्य सोहळा

१५५ जोडप्यांचा एकाच मंचावर निकाह! सिल्लोडमध्ये ‘इज्तेमाई शादीया’चा भव्य सोहळा
१५५ जोडप्यांचा एकाच मंचावर निकाह! सिल्लोडमध्ये ‘इज्तेमाई शादीया’चा भव्य सोहळा

महाराष्ट्र वाणी

सिल्लोड दि १ मे :- सालाबादप्रमाणे याही वर्षी सिल्लोड येथे मुस्लिम समाजातील इज्तेमाई शादीया (सामूहिक विवाह सोहळा) मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला. या भव्य सोहळ्यात तब्बल १५५ जोडप्यांचा निकाह एकाच मंचावर संपन्न झाला. गेल्या २६ वर्षांपासून सातत्याने सुरू असलेला हा उपक्रम समाजात आदर्श निर्माण करत असून, अनेक कुटुंबांना मोठा दिलासा देणारा ठरत आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन नॅशनल एज्युकेशन सोसायटी व आमदार अब्दुल सत्तार मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. सामूहिक विवाहात सहभागी झालेल्या नवदाम्पत्यांना आयोजकांकडून संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात अधिक सुलभ झाली.

या सोहळ्यास अक्कलकुवा येथील मौलाना हुजेफा वस्तानवी, मौलाना मोहम्मद नसीम मिफ्ताई, तसेच आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर भैया, जि.प. सदस्य अब्दुल आमेर आणि प्रशासकीय अधिकारी रईस खान सर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

साधेपणा, धार्मिक परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम असलेल्या या सोहळ्यामुळे समाजातील अनेक कुटुंबांवरील आर्थिक भार कमी झाला आहे. परिसरातील नागरिक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या प्रसंगी सर्व नवदाम्पत्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

सामाजिक ऐक्य, सेवाभाव आणि साधेपणाचा संदेश देणारा हा सोहळा पुन्हा एकदा समाजासाठी प्रेरणादायी ठरला.