पत्रकार अब्दुल कयूम यांच्या कुटुंबीयांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून भेट; दुःखाच्या काळात खंबीरपणे सोबत राहण्याची ग्वाही

पत्रकार अब्दुल कयूम यांच्या कुटुंबीयांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून भेट; दुःखाच्या काळात खंबीरपणे सोबत राहण्याची ग्वाही
पत्रकार अब्दुल कयूम यांच्या कुटुंबीयांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून भेट; दुःखाच्या काळात खंबीरपणे सोबत राहण्याची ग्वाही

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ७ :- साप्ताहिक ‘औरंगाबाद युवा’चे मालक-संपादक तथा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष पत्रकार अब्दुल कयूम अब्दुल रशीद यांच्या अकाली निधनाने पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनानंतर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.

यावेळी कुटुंबीयांशी संवाद साधत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ परिवार या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही देण्यात आली.

सांत्वन भेटीदरम्यान ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विजय चोरडिया, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष कानिफ अन्नपूर्णे, जिल्हा कार्याध्यक्ष किशोर महाजन यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते.

अब्दुल कयूम यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली. आपल्या लेखणीच्या माध्यमातून परिसरातील विविध प्रश्न मांडत त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अचानक निधनामुळे पत्रकारिता क्षेत्राने संवेदनशील आणि सक्रिय सहकारी गमावल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

‘कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण ताकदीने सहभागी’

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्य अध्यक्ष विजय चोरडिया यांनी अब्दुल कयूम यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. ते म्हणाले की, अब्दुल कयूम यांचे निधन ही त्यांच्या कुटुंबापुरती मर्यादित हानी नसून संपूर्ण पत्रकारिता परिवारासाठी मोठा धक्का आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक आव्हाने आणि संघर्ष असतानाही त्यांनी आपल्या विचारांशी आणि लेखणीशी प्रामाणिक राहून काम केले.

अब्दुल कयूम यांच्या अकाली निधनाने मनाला मोठा धक्का बसला असून, या कठीण प्रसंगी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ परिवार त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण ताकदीने सहभागी आहे. कुटुंबीयांना आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी संघटना पुढाकार घेईल, असे चोरडिया यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठीही संघटना सदैव पुढे

जिल्हाध्यक्ष कानिफ अन्नपूर्णे यांनी अब्दुल कयूम यांच्याशी असलेल्या पत्रकारितेतील तसेच वैयक्तिक जिव्हाळ्याच्या संबंधांना उजाळा दिला. पत्रकार म्हणून त्यांनी आपल्या परिसरातील विविध प्रश्न प्रभावीपणे मांडले. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी होती, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

पत्रकारांच्या प्रश्नांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची भूमिका ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने कायम ठेवली आहे. अब्दुल कयूम यांच्या कुटुंबीयांना या कठीण काळात संघटनेच्या माध्यमातून शक्य ते सर्व सहकार्य केले जाईल, असे अन्नपूर्णे यांनी सांगितले.

जिल्हा कार्याध्यक्ष किशोर महाजन यांनीही अब्दुल कयूम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. एका सहकाऱ्याला अचानक गमावणे ही अत्यंत वेदनादायी घटना असल्याचे सांगत, या दुःखातून सावरण्यासाठी कुटुंबीयांच्या सोबत राहण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.

पत्रकार हा समाजासाठी काम करणारा व्यक्ती असला तरी तो आपल्या कुटुंबाचा आधारही असतो. त्यामुळे पत्रकाराच्या कुटुंबावर संकट कोसळल्यास केवळ संवेदना व्यक्त न करता प्रत्यक्ष मदतीसाठीही पत्रकार संघटनांनी पुढे येणे आवश्यक असल्याचे महाजन यांनी नमूद केले.

संदीप काळे यांच्याकडूनही शोक व्यक्त

‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनीही अब्दुल कयूम यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. पत्रकारिता क्षेत्रातील एक सहकारी अकाली गमावणे ही अत्यंत वेदनादायी बाब असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ परिवार सहभागी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सांत्वन भेटीदरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अब्दुल कयूम यांच्या पत्रकारितेतील कार्याचा आणि सहकाऱ्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा उल्लेख केला. त्यांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

अब्दुल कयूम यांच्या निधनामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील पत्रकारिता क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या स्मृती जपत कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही उपस्थितांनी नमूद केले.

अखलाख देशमुख | महाराष्ट्र वाणी न्यूज