"शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरण पेटलं; उच्चस्तरीय चौकशीसाठी अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे धडक मागणी"
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १३ :- वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधित पोलीस अधिकारी व त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींवर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री यांना पत्राद्वारे केली आहे.
सुरेश बोरसे यांचा मृत्यू हा अत्यंत संतापजनक आणि वेदनादायी असून, या घटनेमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे दानवे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींना अल्पावधीत जामीन मिळाल्याने तपास प्रक्रियेच्या निष्पक्षतेबाबतही संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दानवे यांनी केलेल्या आरोपानुसार, वैजापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी नागरगोजे व त्यांचे सहकारी हे ३०२ कलमाखालील गुन्ह्यातील आरोपी रवी आवारे व इतरांसह तपासासाठी वेरूळ येथे आले होते. यावेळी सुरेश बोरसे यांनी केवळ विचारपूस केल्याच्या कारणावरून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने वाहनात बसवून नेण्यात आले तसेच विरोध करणाऱ्या कुटुंबीयांनाही धमकावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संपूर्ण घटनेत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. पोलिसांनी गणवेशाऐवजी खासगी पोशाख का परिधान केला होता? तपासासाठी शासकीय वाहनाऐवजी आरोपींचे विनाक्रमांक वाहन का वापरण्यात आले? सुरेश बोरसे यांना वाहनात का बसवण्यात आले? त्यांच्यावर मारहाण का करण्यात आली? तसेच कुटुंबीयांशी गैरवर्तन का करण्यात आले? या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
घटना १० जून २०२६ रोजी रात्री घडूनही गुन्हा दाखल करण्यात विलंब का झाला, याचाही तपास करण्यात यावा, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. खुलताबाद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी अपुरा असल्याचे सांगत, संपूर्ण घटनाक्रमाचा विचार करून अधिक गंभीर कलमे लावण्याची मागणीही त्यांनी केली.
सुरेश बोरसे यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलीस अधिकारी नागरगोजे, रवी आवारे व त्यांच्या सहकाऱ्यांवर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करून अटक करावी, आरोपींचा जामीन रद्द करावा आणि बोरसे कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
याप्रकरणी आरोपींना वाचवण्याचा अथवा प्रकरण दडपण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. बोरसे कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील, असा इशाराही दानवे यांनी आपल्या पत्रातून दिला आहे.
👉 न्यायाच्या लढ्यात आता सरकार काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.