प्रवासी बनून रिक्षाचालकाला जाळ्यात ओढले; मारहाण करून रिक्षा लुटणाऱ्या तिघांना सिडको पोलिसांनी ठोकल्या बेड्या
रिक्षासह महत्त्वाचा मुद्देमाल जप्त; तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे गुन्ह्याचा छडा
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. २ :- प्रवासी असल्याचे भासवून एका रिक्षाचालकाला निर्जन ठिकाणी नेऊन मारहाण करत त्याची रिक्षा बळजबरीने हिसकावून नेणाऱ्या तिघा आरोपींना सिडको पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे 1.50 लाख रुपये किमतीची रिक्षा, वाहन परवाना आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
सिडको पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, शेख मोहसिन शेख मुनीर (वय 38, रा. बेगमपुरा) हे 29 मे रोजी रात्री मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रिक्षासह प्रवाशांची वाट पाहत होते. त्यावेळी एका महिलेने मिसारवाडी येथे जाण्यासाठी रिक्षा भाड्याने घेतली. मात्र, प्रवासादरम्यान तिने रिक्षा सनी सेंटरजवळील मोकळ्या मैदानाकडे वळविण्यास सांगितले.
तेथे पोहोचल्यानंतर महिलेने फिर्यादीचा मोबाईल घेऊन कोणाला तरी फोन केला आणि कॉलचा नंबर डिलीट केला. काही वेळातच तीन अनोळखी युवक घटनास्थळी आले. त्यांनी रिक्षाचालकाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच धारदार वस्तूने डोक्यावर वार करून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी रिक्षा आणि संबंधित कागदपत्रे बळजबरीने घेऊन पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती, तांत्रिक तपास आणि आरोपींच्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी मिसारवाडी परिसरात शोधमोहीम राबवली. त्यात शेख मोबीन शेख अजीज (वय 34) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या साथीदारांची नावे उघड केली.
यानंतर पोलिसांनी उजेब खान वसीम खान (वय 22) आणि अजीम कासीम पठाण (वय 23) या दोघांनाही अटक केली. आरोपींकडून फिर्यादीची रिक्षा, वाहन चालविण्याचा परवाना आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त रत्नाकर नवले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल येरमे, पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर, पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गायके तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गायके करीत आहेत.
👉 वाचत रहा ‘महाराष्ट्र वाणी’ – आपल्या परिसरातील प्रत्येक घडामोडींचा वेगवान आणि विश्वासार्ह आवाज!