पहिलीपासून हिंदी शिकवणे म्हणजे 'शिक्षणावर' अन्याय!‘आप’चा आक्रोश: हिंदी सक्ती मागे घ्या, बहुभाषिक पर्याय द्या!
महाराष्ट्र वाणी न्युज
पुणे दि २५ जून :– महाराष्ट्र सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषा पहिल्याच वर्गापासून शिकवणे 'अनिवार्य' केले. या निर्णयाचा शिक्षण क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळात मोठा विरोध होत असून, आम आदमी पार्टीने याला 'मुलांवर अन्याय' व 'भाषिक सक्ती' असे ठरवत आज पुण्यातील कर्वे पुतळा चौकात आंदोलन करून निषेध नोंदवला.
'शिक्षा' नको, 'शिक्षण' हवे अशा घोषणांनी परिसर दणाणला. सरकारने सुरुवातीला सक्ती मागे घेतल्याचे भासवले, पण शाळा सुरू होताच ‘सर्वसाधारणपणे हिंदी शिकवण्यात येईल’ असा आदेश काढून पुन्हा एकदा शब्दफेर करत सक्तीचा आडमार्ग स्वीकारला, असा आरोप या वेळी करण्यात आला.
भाषा नव्हे, राजकारण!
मुख्यत्वे बहुजन समाजाला इंग्रजीचे महत्त्व असून, मराठीबद्दल जिव्हाळा आणि अभिमान आहे. त्यामुळे पहिल्यापासून हिंदी लादण्याचा निर्णय हा भाजपच्या नेतृत्वाखालील युती सरकारचा ‘राजकीय अजेंडा’ असल्याचा आरोप आपने केला. हिंदी व्यवहारभाषा बनवण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि भाषिक अस्मितेवर घाला असल्याचे मत मांडण्यात आले.
भाजप नेते गप्प का?
या विषयावर भाजपचे नेते मौन का बाळगतात, असा थेट सवाल उपस्थित करत आम आदमी पार्टीने भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधला. शिक्षण खात्याशी संबंधित चंद्रकांत पाटील, माजी मंत्री जावडेकर, कोथरूडमधील भाजप नेते यांची नावे घेत त्यांना जाब विचारण्यात आला. मायमराठीचा गजर करणारे नेते प्रत्यक्ष कृतीत मात्र गप्प का बसलेत, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
भविष्यासाठी मागण्या स्पष्ट:
तिसरीपासून तिसरी भाषा वैकल्पिक ठेवावी
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार क्रमशः मातृभाषा, दुसरी भाषा आणि तिसरी भाषा याचे शिक्षण टप्प्याटप्प्याने द्यावे
विद्यार्थ्यांना संस्कृतसह अन्य देशी-विदेशी भाषांचा पर्याय खुला ठेवावा
कोणत्याही एका भाषेची सक्ती करू नये
प्रमुख उपस्थिती:
मुकुंद किर्दत, सुरेखा भोसले, शंतनू पांडे, शितल कांडेलकर, अमोल मोरे, संतोष काळे, सुभाष करांडे, अंजना वांजळे, अभिजित खंडागळे आदींसह 'आप'च्या राज्यभरातील कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
भाषा सक्ती नव्हे, विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची निवड महत्त्वाची! – असा संदेश देत 'आप'ने लढ्याचा नवा टप्पा सुरू केला आहे.
(आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा –आणि ही बातमी शेअर करा!)