अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळावा; सचिव डॉ. माधवी खोडे-चवरे यांची आयुक्त कार्यालयास भेट
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ७ :- महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी कार्यालयीन दौऱ्यानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील अल्पसंख्याक आयुक्त कार्यालयास भेट दिली. यावेळी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी व नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ वेळेत आणि प्रभावीपणे मिळावा, यासंदर्भात विविध महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी मार्टी कृती समिती महाराष्ट्रच्या वतीने सचिव डॉ. माधवी खोडे-चवरे यांचा सत्कार करण्यात आला. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक योजना, शिष्यवृत्ती तसेच अन्य कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याबाबत चर्चा झाली.
विशेषतः पात्र विद्यार्थ्यांना योजनांचा लाभ मिळण्यास होणारा विलंब कमी करणे, योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि लाभार्थ्यांना आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी आणि नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ समान व पारदर्शक पद्धतीने मिळावा, यासाठी प्रशासन आणि संबंधित संस्थांमध्ये समन्वय वाढविण्याची गरज यावेळी उपस्थित करण्यात आली.
यावेळी मार्टी कृती समिती महाराष्ट्रचे अॅड. अझर पठाण, सर आसिफ, साजिद पटेल, जाहेद अलकासेरी यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अखलाख देशमुख | महाराष्ट्र वाणी न्यूज