एच. जे. थिम कॉलेजमध्ये ‘शी बॉक्स’चे उद्घाटन; महिला सुरक्षेसाठी महाविद्यालयाचा पुढाकार

एच. जे. थिम कॉलेजमध्ये ‘शी बॉक्स’चे उद्घाटन; महिला सुरक्षेसाठी महाविद्यालयाचा पुढाकार
एच. जे. थिम कॉलेजमध्ये ‘शी बॉक्स’चे उद्घाटन; महिला सुरक्षेसाठी महाविद्यालयाचा पुढाकार

जळगाव (विशेष प्रतिनिधी) दि १२ :- महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे, त्यांच्या तक्रारींना योग्य व्यासपीठ मिळवून देणे आणि महिला सन्मानाची जाणीव अधिक दृढ करणे या उद्देशाने इक्रा एज्युकेशन सोसायटी संचालित एच. जे. थिम आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, मेहरुण येथे ‘शी बॉक्स’ (SHE Box) सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार समितीच्या (ICC) वतीने आयोजित इंडक्शन-कम-अवेअरनेस कार्यक्रमात हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन इक्रा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांच्या हस्ते ‘शी बॉक्स’चे अनावरण करून करण्यात आले. यावेळी त्यांनी महिला आणि विद्यार्थिनींसाठी सुरक्षित, सन्मानपूर्ण व निर्भय वातावरण निर्माण करण्याची संस्थेची भूमिका स्पष्ट केली. ‘शी बॉक्स’ हा केवळ एक उपक्रम नसून महिला सुरक्षेबाबत संस्थेची बांधिलकी दर्शविणारे महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वकार शेख यांनी महिलांना सुरक्षित आणि भयमुक्त शैक्षणिक व कार्यपरिसर मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले. हा अधिकार जपण्यासाठी महाविद्यालय प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

अंतर्गत तक्रार समितीच्या कार्याची विद्यार्थिनींना माहिती

कार्यक्रमादरम्यान डॉ. ए. एफ. बासित यांनी अंतर्गत तक्रार समितीची भूमिका, तिची कार्यपद्धती आणि विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांचे अधिकार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कोणत्याही प्रकारच्या तक्रारींबाबत जागरूक राहण्यासोबतच महाविद्यालयीन परिसरात परस्पर आदर, प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेची संस्कृती निर्माण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एम. काझी यांनी केले, तर डॉ. एफ. एस. शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिला सुरक्षेबाबत जागरूकता वाढविणे आणि तक्रार निवारणासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे या दृष्टीने महाविद्यालयातील हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

महाराष्ट्र वाणी/ सत्यासाठी निर्भीड / जनतेसाठी समर्पित