दुष्काळाच्या झळा विद्यार्थ्यांपर्यंत; परीक्षा व शैक्षणिक शुल्क माफ करण्याची SFIची विद्यापीठाकडे मागणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १ :- मराठवाड्यात निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील परीक्षा शुल्कासह विविध शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) ने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे.
मराठवाड्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी आणि अनियमित राहिल्याने शेतीबरोबरच पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा-पाणी आणि ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिणामी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी तसेच सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक भार वाढला असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या खर्चावरही होत असल्याचे SFIने विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
दुष्काळामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ नये, यासाठी विद्यापीठाने तातडीने शुल्कमाफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्याची मागणी SFIने केली आहे.
तसेच पदवी, पदव्युत्तर आणि अन्य अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणारे विविध शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली. पीएच.डी. व इतर संशोधक विद्यार्थ्यांनाही शुल्कमाफीचा लाभ देण्यात यावा, अशी भूमिका SFIने मांडली आहे. त्यामध्ये परीक्षा, नोंदणी, प्रगती अहवाल, प्रबंध सादरीकरण आणि इतर संबंधित शैक्षणिक शुल्काचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली.
संलग्न महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोणत्याही अतिरिक्त स्वरूपाचे शैक्षणिक शुल्क आकारू नये, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट सूचना जारी कराव्यात. तसेच शुल्कमाफीबाबत तातडीने अधिकृत आदेश काढून तो विद्यापीठाच्या सर्व विभागांसह संलग्न महाविद्यालयांना लागू करावा, अशी मागणीही SFIने केली आहे.
दुष्काळाच्या परिस्थितीत केवळ आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थीहिताचा निर्णय तातडीने घ्यावा, असे SFIने निवेदनात म्हटले आहे.
यावेळी SFIच्या मनिषा बल्लाळ, आशितोष ठोंबरे, दिनेश सूर्यवंशी, तेजस सरवदे, अभिषेक गायकवाड यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
अखलाख देशमुख - महाराष्ट्र वाणी न्यूज