"तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिले, तुझ्या मायचा पगारही!" – भाजप आमदार बबनराव लोणीकरांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांचा संताप

"तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिले, तुझ्या मायचा पगारही!" – भाजप आमदार बबनराव लोणीकरांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांचा संताप

महाराष्ट्र वाणी न्युज 

दि २६ जून:- महाराष्ट्रात सध्या एक वादग्रस्त वक्तव्य चांगलंच गाजत आहे. भाजपचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांवर टीका करताना वापरलेली भाषा चांगलीच आगीत तेल ओतणारी ठरली आहे. एका गावातील टीकाकारांवर बोलताना लोणीकर म्हणाले – "तुझ्या बापाला पेरणीसाठी पैसे नरेंद्र मोदींनी दिले. तुझ्या मायच्या, बायकोच्या, बहिणीच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे गेले. अंगावरचे कपडे, चप्पल, हातातलं डबडं हे सगळं आम्हीच दिलं. आम्हाला मिळालेले पैसेच तू वापरतोस आणि आम्हालाच विरोध करतोस?"

या वक्तव्यानंतर विरोधकांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना (ठाकरे) गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी थेट एक्स (Twitter) वर लोणीकरांचा व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर टीका केली. दानवे म्हणाले, "ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! लोकशाहीत अशी भाषा चालणार नाही. तुमचं सगळं जनतेमुळे आहे – कपडे, बूट, गाडीचं डिझेल, विमानाचं तिकीट आणि आमदारकीसह सत्तेतील स्थान सुद्धा!" त्यांनी नागरिकांना ही भाषा लक्षात ठेवण्याचे आवाहन केले.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. "लोणीकरांनी किती लोणी-तूप खाल्लंय हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांनी जनतेची थट्टा थांबवावी. अन्यथा आम्ही त्यांना गावागावात फिरू देणार नाही," असा इशाराच त्यांनी दिला.

भाजप आमदाराने जनतेच्या सन्मानाला हात घातल्याने आता या वादाला राजकीय व सामाजिक वळण मिळालं आहे. लोकशाहीत सत्ताधाऱ्यांनी वापरणारी भाषा किती जबाबदारीची असावी, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

 – ही फक्त टीका नाही, जनतेच्या स्वाभिमानावर आघात आहे!

अधिक अपडेटसाठी वाचा – [महाराष्ट्र वाणी.com]