छत्रपती संभाजीनगरात 96.28 टक्के गणना अर्जांचे वितरण पूर्ण; मतदारांसाठी 17 ऑगस्ट पर्यंत संधीचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.
विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अर्ज सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ५ :- भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR-2026) मोहिमेला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 32 लाख 16 हजार 167 मतदारांपैकी 30 लाख 96 हजार 631 मतदारांना गणना अर्जांचे वितरण पूर्ण झाले आहे. हे प्रमाण 96.28 टक्के इतके आहे. तसेच, प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 25 लाख 3 हजार 432 अर्जांचे (77.84 टक्के) डिजिटायझेशन पूर्ण करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकाधिक मतदारांना अर्ज भरण्याची संधी मिळावी यासाठी गणना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
ज्या मतदारांनी अद्याप अर्ज भरलेला नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांच्याकडे गृहभेटीदरम्यान किंवा थेट अर्ज जमा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय प्रगतीमध्ये वैजापूर मतदारसंघाने 100 टक्के अर्ज वितरणाचा टप्पा गाठला आहे. तर डिजिटायझेशनमध्ये कन्नड (90.77 टक्के) आणि वैजापूर (90.79 टक्के) हे मतदारसंघ आघाडीवर आहेत.
मतदारसंघनिहाय प्रगती :
सिल्लोड – अर्ज वितरण 99.83 टक्के, डिजिटायझेशन 85.71 टक्के
कन्नड – अर्ज वितरण 99.89 टक्के, डिजिटायझेशन 90.77 टक्के
फुलंब्री – अर्ज वितरण 96.65 टक्के, डिजिटायझेशन 77.33 टक्के
औरंगाबाद (मध्य) – अर्ज वितरण 93.24 टक्के, डिजिटायझेशन 62.43 टक्के
औरंगाबाद (पश्चिम) – अर्ज वितरण 90.33 टक्के, डिजिटायझेशन 67.35 टक्के
औरंगाबाद (पूर्व) – अर्ज वितरण 88.90 टक्के, डिजिटायझेशन 62.63 टक्के
पैठण – अर्ज वितरण 99.40 टक्के, डिजिटायझेशन 85.50 टक्के
गंगापूर – अर्ज वितरण 99.85 टक्के, डिजिटायझेशन 82.55 टक्के
वैजापूर – अर्ज वितरण 100 टक्के, डिजिटायझेशन 90.79 टक्के
जिल्ह्यातील 3,264 बूथ लेव्हल अधिकारी घरभेटीद्वारे अर्जांचे वितरण, पडताळणी आणि संकलनाचे काम युद्धपातळीवर करत आहेत.
जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर यांनी सर्व पात्र मतदारांना 17 ऑगस्टपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह गणना अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत अचूक आणि अद्ययावत राहण्यासाठी नागरिकांनी या विशेष पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे त्यांनी म्हटले आहे.