छत्रपती संभाजीनगरात अंमली पदार्थांविरोधात प्रशासन सज्ज; ८०० शाळांमध्ये जनजागृती अभियान राबविणार

छत्रपती संभाजीनगरात अंमली पदार्थांविरोधात प्रशासन सज्ज; ८०० शाळांमध्ये जनजागृती अभियान राबविणार
छत्रपती संभाजीनगरात अंमली पदार्थांविरोधात प्रशासन सज्ज; ८०० शाळांमध्ये जनजागृती अभियान राबविणार

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ४ :- अंमली पदार्थांचे सेवन, तस्करी आणि बेकायदेशीर व्यापार रोखण्यासाठी तसेच विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधण्यासाठी जिल्हा स्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती (एनसीओआरडी)ची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अंमली पदार्थांविरोधातील उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे उपअधीक्षक सचिन गाढवे यांच्यासह अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क, शिक्षण, न्यायवैद्यक प्रयोगशाळा, एमआयडीसी, पोलीस विभाग तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या परिपत्रकानुसार आणि दहशतवाद विरोधी पथकाच्या निर्देशानुसार जिल्हा व तालुका स्तरावर अंमली पदार्थांविरोधात विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अंमली पदार्थांचे उत्पादन, वाहतूक, विक्री आणि सेवन यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

बैठकीत जिल्ह्यातील सुमारे ८०० शाळांमध्ये अंमली पदार्थांविरोधात जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नशामुक्त पंधरवाडा साजरा करणे, पथनाट्यांच्या माध्यमातून वर्षभर जनजागृती करणे, शाळा-महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये अंमली पदार्थविरोधी शपथ घेणे, तसेच पोलीस पाटील मेळाव्यांच्या माध्यमातून गावपातळीवर जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.

याशिवाय शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात अंमली पदार्थांवरील बंदीची प्रभावी अंमलबजावणी, ई-सिगारेटच्या वापर आणि विक्रीबाबत जनजागृती तसेच नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती नार्कोटिक्स हेल्पलाईन क्रमांक ९१७५७७७६४६ वर देण्याचे आवाहन करण्यात आले. जनजागृतीसाठी विशेष स्टिकर्सही लावण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.