जन्म प्रमाणपत्रातील नाव दुरुस्तीची प्रक्रिया तातडीने सुरू करा; प्रलंबित जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे निकाली काढा : SDPI चे महापालिका आयुक्तांना निवेदन

जन्म प्रमाणपत्रातील नाव दुरुस्तीची प्रक्रिया तातडीने सुरू करा; प्रलंबित जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे निकाली काढा : SDPI चे महापालिका आयुक्तांना निवेदन

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ३ :- सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) च्या औरंगाबाद जिल्हा शाखेच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन २०१५ पूर्वीच्या जन्म प्रमाणपत्रांमधील नाव दुरुस्तीची प्रक्रिया तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांच्या अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करून प्रत्येक अर्जदाराला इनवर्ड क्रमांक आणि अधिकृत पोहोच पावती देण्याची व्यवस्था त्वरित लागू करण्याची मागणीही करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २०१५ पूर्वी जारी करण्यात आलेल्या अनेक जन्म प्रमाणपत्रांमध्ये नाव, आडनाव तसेच स्पेलिंगच्या चुका असल्याने नागरिकांना आधार कार्ड, पासपोर्ट, शैक्षणिक कागदपत्रे, मतदार ओळखपत्र आणि इतर शासकीय नोंदींमध्ये नावाची एकरूपता राखताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, नाव दुरुस्तीची प्रक्रिया बंद असल्याने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

याशिवाय, नाव दुरुस्तीसाठी अर्ज स्वीकारताना अर्जदारांना इनवर्ड क्रमांक किंवा अधिकृत पोहोच पावती दिली जात नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येत असल्याचे SDPI ने म्हटले आहे. त्यामुळे अर्ज सादर केल्याचा कोणताही पुरावा राहत नसून अर्जाच्या स्थितीचा पाठपुरावा करणेही कठीण होत आहे.

नवीन जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांसाठी करण्यात येणाऱ्या अर्जांच्या प्रक्रियेत होत असलेल्या विलंबाबाबतही SDPI ने तीव्र नाराजी व्यक्त केली. आवश्यक कागदपत्रे सादर करूनही अनेक अर्जदारांना अनेक महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याने विद्यार्थी, वारसदार आणि विविध शासकीय योजनांचे लाभार्थी यांना मानसिक, आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महापालिका प्रशासनाने २०१५ पूर्वीच्या जन्म प्रमाणपत्रांमधील नाव दुरुस्तीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, प्रत्येक अर्जाला इनवर्ड क्रमांक व अधिकृत पोहोच पावती द्यावी, प्रलंबित अर्जांचा त्वरित निपटारा करावा, अर्जाची स्थिती ऑनलाइन अथवा पारदर्शक पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून द्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देऊन नागरिकांच्या हेलपाट्यांना आळा घालावा, अशा मागण्या SDPI ने केल्या आहेत.

या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही आणि सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही SDPI च्या वतीने देण्यात आला.

यावेळी प्रदेश महासचिव सय्यद कलीम, जिल्हाध्यक्ष समीर शाह (इंजिनिअर), जिल्हा महासचिव अब्दुल अलीम शेख, मोहसिन खान, जिल्हा सदस्य आरेफ शाह, पूर्व विधानसभा अध्यक्ष हाफिज अबुजर पटेल, रियाज सौदागर, सिराज शेख, मुबारक चौस तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.