खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांचा संताप; डिझेल, खत व हमीभावासाठी काँग्रेसचे तहसील कार्यालयावर धडक
महाराष्ट्र वाणी
सिल्लोड दि २५ :- खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना सिल्लोड तालुक्यात निर्माण झालेल्या डिझेल टंचाई, खतांचा अपुरा पुरवठा आणि शेतीमालाला मिळत नसलेल्या अत्यल्प बाजारभावाच्या प्रश्नावर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सिल्लोड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी (दि. २५ मे) तहसीलदारांना निवेदन देत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
तालुकाध्यक्ष भास्करराव घायवट पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात सध्या तालुक्यात डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची नांगरणी, मशागत व इतर शेतीकामे ठप्प होत असल्याचे नमूद करण्यात आले. खरीप हंगामाच्या तोंडावरच इंधन संकट निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत असून प्रशासनाने तात्काळ सुरळीत डिझेल पुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली.
यासोबतच मका, सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून उत्पादन खर्च वाढत असताना बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे. शासनाने तातडीने बाजारभाव नियंत्रणात आणून शेतमालाला योग्य दर मिळवून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली.
आगामी खरीप हंगाम लक्षात घेता खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासह शेतकऱ्यांना वेळेत खते मिळावीत, यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन करावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले. वेळेत इंधन व खतांचा पुरवठा न झाल्यास शेती उत्पादनावर गंभीर परिणाम होऊन शेतकरी आणखी अडचणीत येतील, असा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला.
दरम्यान, प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष न दिल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने रस्ता रोको, उपोषण तसेच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस इकबाल अहमद, फरमान कुरेशी, विनायक पाचिंगे, देवीदास दांडगे, जिजाताई अंभोरे, संजय जाधव, गजानन पाचिंगे, अहमद शेख, शालिक मुके, भानुदास पाचिंगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“डिझेल, खत आणि हमीभावाचा प्रश्न निकाली काढा; अन्यथा शेतकऱ्यांचा आक्रोश आंदोलनातून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही!”