खत विक्रीच्या नव्या मोबाईल प्रणालीविरोधात काँग्रेसचा रस्ता रोको; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला इशारा
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १५ :- खत विक्रीसाठी राज्य शासनाने लागू केलेल्या नव्या मोबाईल प्रणालीमुळे शेतकरी आणि कृषी सेवा केंद्र चालकांना भेडसावणाऱ्या अडचणींच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ चौक, जालना रोड येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात खासदार डॉ. कल्याणराव काळे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास बापू औताडे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष, फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी, शेतकरी तसेच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राज्य शासनाने खत विक्रीसाठी सुरू केलेल्या नव्या मोबाईल प्रणालीमुळे तांत्रिक अडचणी, नेटवर्क समस्या, खत खरेदीतील विलंब आणि शेतकऱ्यांची होणारी गैरसोय वाढल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्रस्त असून कृषी सेवा केंद्र चालकांनाही कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या या न्याय्य प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, सदर प्रणालीची सक्ती त्वरित थांबवावी आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी काँग्रेस नेत्यांनी, "शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या अडचणी दूर करणे ही शासनाची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कायम त्यांच्या पाठीशी उभा राहील," असा निर्धार व्यक्त केला.
👉 शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सुरू असलेल्या या आंदोलनाची पुढील घडामोडी जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र वाणी’सोबत जोडलेले रहा.