एसटीच्या ताफ्यात आणखी ५ हजार ‘लालपरी’; बसफेऱ्या वाढणार, प्रवाशांना मिळणार दर्जेदार सेवा
महाराष्ट्र वाणी
मुंबई दि १५ :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या बससेवेचे आधुनिकीकरण आणि ताफा विस्तारण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि नियमित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल ५ हजार नव्या ‘लालपरी’ बसेसच्या खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
नव्या बसेस टप्प्याटप्प्याने एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतुकीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. जुन्या बसेसवरील वाढता ताण कमी होण्यासोबतच विविध मार्गांवरील बसफेऱ्यांची उपलब्धता वाढविण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे.
दरम्यान, आतापर्यंत २,६४० नव्या ‘लालपरी’ बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर ३ हजार ‘राजमाता जिजाऊ’ बसेस ताफ्यात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
‘मागेल त्याला बसफेरी’ देण्याचा प्रयत्न
नव्या ५ हजार बसेसच्या माध्यमातून प्रवाशांच्या मागणीनुसार अधिक बसफेऱ्या उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील प्रवाशांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
एसटी महामंडळ पारंपरिक डिझेल बसेसबरोबरच आता पर्यावरणपूरक ई-बसेसच्या दिशेनेही वेगाने वाटचाल करत आहे. आगामी काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्यावर भर दिला जाणार आहे.
प्रवाशांची सुरक्षितता, सुविधा आणि दर्जेदार सेवा यांना प्राधान्य देत एसटी महामंडळाच्या ताफ्याचा विस्तार केला जात आहे. नव्या बसेसमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील ‘लोकवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी सेवेला आणखी बळ मिळण्याची अपेक्षा आहे.