हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्यांवर पोलिसांचा ‘डंडा’; एकाच दिवशी ५ हजार १७५ वाहनचालकांवर कारवाई!
📰✍️
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २ :- शहरात वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी हेल्मेटविरोधातील नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी (दि. २) विशेष मोहीम राबवत शहरातील विविध चौकांमध्ये हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या तब्बल ५ हजार १७५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पोलीस आयुक्तांनी शहरातील नागरिकांना दुचाकी चालविताना हेल्मेटचा सक्तीने वापर करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर वाहतूक शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कारवाईचा परिणाम म्हणून नागरिकांमध्ये हेल्मेट परिधान करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हर्सूल टी, मुकुंदवाडी चौक, जळगाव टी, केंब्रिज चौक, हायकोर्ट सिग्नल, सेव्हन हिल, दर्गा चौक, आकाशवाणी चौक, अमरप्रीत चौक, क्रांती चौक, सेशन कोर्ट, महावीर चौक, रेल्वे स्टेशन चौक, कार्तिकी चौक, मिलकॉर्नर चौक, नगरनाका, ए.एस. क्लब चौक, ओअॅसिस चौक आणि कामगार चौकासह विविध ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत हेल्मेट न वापरणाऱ्या ५ हजार १७५ दुचाकीस्वारांवर कारवाई करून तब्बल ५८ लाख ८९ हजार १५० रुपयांचा दंड आकारण्यात आला, तर त्यापैकी ४७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन चौधरी, रेखा लोंढे, नितू तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि गच्चे, सचिन मिरधे तसेच विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार या मोहिमेत सहभागी झाले होते.
दरम्यान, हेल्मेट हे केवळ पोलिसांच्या दंडापासून बचाव करण्यासाठी नसून, स्वतःच्या मौल्यवान जीवाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक आहे, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. येत्या काळात हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीचालकांविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याने नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून हेल्मेटचा नियमित वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.