स्वच्छ वायू सर्वेक्षण 2026 मध्ये छत्रपती संभाजीनगरची दमदार कामगिरी; देशात 16वा क्रमांक

34व्या स्थानावरून थेट 16व्या क्रमांकावर झेप; 200 पैकी 178 गुणांची कमाई

स्वच्छ वायू सर्वेक्षण 2026 मध्ये छत्रपती संभाजीनगरची दमदार कामगिरी; देशात 16वा क्रमांक
स्वच्छ वायू सर्वेक्षण 2026 मध्ये छत्रपती संभाजीनगरची दमदार कामगिरी; देशात 16वा क्रमांक

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १३ :- केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण 2026’ मध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या देशातील 48 शहरांच्या श्रेणीत शहराने 16वा क्रमांक मिळवला असून, महानगरपालिकेला 200 पैकी 178 गुण प्राप्त झाले आहेत.

मागील वर्षी शहराचा क्रमांक 34वा होता. यंदा तब्बल 18 स्थानांची सुधारणा करत छत्रपती संभाजीनगरने देशातील आघाडीच्या शहरांमध्ये स्थान मिळवले आहे. मागील वर्षी 155 गुण मिळाले होते, तर यंदा गुणसंख्या 178 वर पोहोचली आहे.

शहरातील धूळ नियंत्रण, कचरा व्यवस्थापन, कचरा जाळण्यास प्रतिबंध, पर्यावरणपूरक वाहनांचा वापर, बांधकामातून होणारे प्रदूषण रोखणे आणि नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती यांसारख्या उपाययोजनांमुळे ही सुधारणा झाल्याचे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले.

रस्त्यांवरील धूळ कमी करण्यावर भर

शहरातील हवेच्या प्रदूषणात रस्त्यांवरील धुळीचा मोठा वाटा असल्याने महानगरपालिकेने प्रमुख रस्ते, चौक आणि वाहतूक मार्गांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नियमित साफसफाई, यांत्रिक पद्धतीने रस्ते स्वच्छ करणे आणि रस्त्यांच्या कडेला साचलेली माती-धूळ हटविण्याच्या उपाययोजना केल्या जात आहेत.

वाहनांची सतत वर्दळ असलेल्या भागात धुळीचे कण पुन्हा हवेत मिसळू नयेत, यासाठी नियमित स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येत आहे.

बंदिस्त वाहनांमधून कचरा वाहतूक

कचरा संकलन आणि वाहतुकीमध्ये अधिक शिस्त आणण्यासाठी शहरात बंदिस्त वाहनांचा वापर केला जात आहे. त्यामुळे वाहतुकीदरम्यान कचरा रस्त्यावर पडणे, दुर्गंधी निर्माण होणे तसेच कचऱ्यातील सूक्ष्म कण हवेत मिसळण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत होत आहे.

यासोबतच RTS (Refuse Transfer Station) व्यवस्थेचा वापरही प्रभावीपणे केला जात आहे. विविध भागांतून संकलित केलेला कचरा ट्रान्सफर स्टेशनवर आणल्यानंतर मोठ्या क्षमतेच्या बंदिस्त वाहनांद्वारे प्रक्रिया केंद्राकडे पाठविला जात आहे.

कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई

उघड्यावर कचरा जाळल्यामुळे धूर आणि सूक्ष्म कणांमुळे हवेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे शहरात कचरा जाळण्यास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृतीसोबतच तपासणी आणि दंडात्मक कारवाई केली जात आहे.

नागरिकांनी कचरा जाळण्याऐवजी तो महानगरपालिकेच्या संकलन व्यवस्थेकडे द्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे. ओला आणि सुका कचरा स्त्रोतावरच वेगळा करणे, नियमित संकलन आणि शास्त्रोक्त विल्हेवाट यावरही भर देण्यात आला आहे.

नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, कचरा जाळणे, अस्वच्छता निर्माण करणे, प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणे किंवा कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्या पथकांकडून कारवाई केली जात आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि नागरिक मित्र पथकांकडून विविध भागांत पाहणी, गस्त आणि तक्रारींच्या आधारे कारवाई केली जात आहे. कारवाईसोबतच नागरिकांचे प्रबोधन करण्यावरही भर देण्यात येत आहे.

ई-वाहनांचा वाढता वापर

कचरा संकलन व्यवस्थेत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यात आला आहे. पारंपरिक इंधनावरील वाहनांच्या तुलनेत ई-वाहनांमधून थेट tail-pipe emission होत नसल्याने स्थानिक पातळीवरील प्रदूषण कमी करण्यास त्यांचा उपयोग होत आहे.

घराघरातून कचरा संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये पर्यावरणपूरक वाहनांचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत.

बांधकाम व पाडकामातून होणारी धूळ रोखण्याचे प्रयत्न

बांधकाम आणि पाडकामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित आस्थापनांना आवश्यक सूचना देण्यात येत आहेत. बांधकाम साहित्य रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी विखुरले जाऊ नये, तसेच त्यातून धूळ निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जात आहे.

वाहतूक प्रदूषणावरही लक्ष

वाहनांमधून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. वाहतूक कोंडी कमी करणे, रस्त्यांची स्वच्छता राखणे आणि नागरिकांमध्ये प्रदूषण नियंत्रणाबाबत जनजागृती करणे यावर भर देण्यात येत आहे.

हरित क्षेत्र आणि पर्यावरण जनजागृती

शहरातील हरित क्षेत्र वाढविणे, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचे उपक्रम राबविले जात आहेत. नागरिकांनी कचरा वर्गीकरण करणे, कचरा न जाळणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे यासाठी विविध माध्यमांतून प्रबोधन केले जात आहे.

AQI मध्येही सुधारणा

महानगरपालिकेच्या माहितीनुसार, शहराचा मागील वर्षीचा AQI 99 होता. यंदा तो 76 पर्यंत खाली आला आहे. हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकातील ही सुधारणा शहरातील प्रदूषण नियंत्रणाच्या प्रयत्नांना मिळालेले सकारात्मक परिणाम म्हणून पाहिली जात आहे.

18 स्थानांची सुधारणा; आयुक्त अमोल येडगे यांचे मत

महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पर्यावरण विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या नेतृत्वाखाली विविध उपाययोजनांना गती देण्यात आली आहे.

याबाबत आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले की, मागील वर्षीच्या 34व्या क्रमांकावरून यंदा 16व्या क्रमांकावर झालेली झेप ही शहरासाठी महत्त्वाची कामगिरी आहे. आगामी काळात वायू प्रदूषणाचे प्रमुख स्रोत कमी करणे, पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देणे, कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करणे आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

दरम्यान, महापौर समीर राजूरकर यांनीही या कामगिरीचे स्वागत केले. महानगरपालिकेच्या विविध विभागांसोबतच स्वच्छता कर्मचारी, नागरिक, सामाजिक संस्था आणि इतर घटकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे शहराने ही प्रगती साधल्याचे त्यांनी नमूद केले.

आगामी काळात या उपाययोजनांना आणखी गती देऊन ‘स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त छत्रपती संभाजीनगर’ हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.