स्टेशनवरच्या निरोपात अश्रू होते… आज स्मशानातही मोबाईल; बदलला काळ की हरवली माणुसकी?
महाराष्ट्र वाणी विषेश
एकेकाळी रेल्वे स्टेशनवर एखाद्या आपल्या माणसाला निरोप देणे म्हणजे भावनांचा एक वेगळाच क्षण असायचा. ट्रेन सुटेपर्यंत हात हलवत राहायचे आणि डबा नजरेआड होईपर्यंत डोळे त्या दिशेनेच लागून राहायचे. काही क्षणांच्या विरहानेही डोळे पाणावायचे, कारण नात्यांमध्ये आपुलकी आणि जिव्हाळा असायचा.
पण आजचे चित्र बदलले आहे.
गर्दीत एखादी ओळखीची व्यक्ती दिसली तरी थांबून दोन शब्द बोलण्याइतका वेळ अनेकांकडे नाही. जीवनाच्या धावपळीत माणूस इतका गुंतला आहे की शेजारी कोण आहे, त्याच्या आयुष्यात काय सुरू आहे, याची विचारपूस करण्याची संवेदनाही कमी होत चालली आहे.
याहून वेदनादायक चित्र म्हणजे, एखाद्या व्यक्तीच्या अंतिम निरोपाच्या वेळीही अनेकांचे लक्ष मोबाईलच्या स्क्रीनवर असते. चिता धगधगत असताना काही जण संदेश, व्हिडिओ आणि सोशल मीडियात व्यस्त दिसतात. दुःखाची खोली कमी झाली की भावना व्यक्त करण्याची पद्धत बदलली, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.
खरे तर बदल फक्त काळाचा झालेला नाही, तर आपल्या जगण्याच्या पद्धतीचाही झाला आहे.
आजच्या आयुष्यात जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्वकाही खर्च, सुविधा आणि वैद्यकीय व्यवस्थांशी जोडले गेले आहे. जन्मासाठी मोठे हॉस्पिटल, उपचारांसाठी लाखो रुपयांचा खर्च आणि शेवटच्या क्षणी आधुनिक यंत्रांवर अवलंबून राहण्याची वेळ येते. मात्र या दोन टोकांमधील आयुष्य अनेकदा कर्जाचे हप्ते, स्पर्धा, प्रतिष्ठेचा दिखावा आणि आर्थिक धावपळ यामध्ये संपून जाते.
खरं मनापासून हसणं आणि मन मोकळं करून रडणंही आज दुर्मिळ होत चाललं आहे.
आपण वस्तू जपण्यासाठी मोठमोठी कपाटे आणि लॉकर तयार करतो; पण नाती जपण्यासाठी वेळ देत नाही. स्वार्थ असेपर्यंत अनेक संबंध घट्ट वाटतात, मात्र गरज संपली की काही नातीही दूर जातात. माणसाच्या उपयोगापेक्षा त्याच्या अस्तित्वाला महत्त्व देण्याची सवय आपण हळूहळू विसरत चाललो आहोत.
तंत्रज्ञानाने जग जवळ आणले, पण अनेकदा मनांमधील अंतर वाढले. संपर्कांची संख्या वाढली, पण संवाद कमी झाला. ओळखी हजारो झाल्या, पण मन मोकळं करून बोलावं अशी माणसं मात्र मोजकीच उरली.
तरीही सर्व काही संपलेले नाही.
आजही या जगात प्रेमाने विचारपूस करणारी, संकटात हात धरून उभी राहणारी, कोणत्याही अपेक्षेशिवाय मदत करणारी आणि दुसऱ्याच्या दुःखाने डोळे पाणावणारी माणसं आहेत. समाजात माणुसकी टिकून आहे, कारण अशी संवेदनशील माणसं अजूनही आपल्यामध्ये आहेत.
बदलाची सुरुवात दुसऱ्यांकडून नव्हे, तर स्वतःपासून करायला हवी.
थोडा वेळ आपल्या माणसांसाठी काढूया. भेटल्यावर मनापासून विचारपूस करूया. दुःखात सोबत देऊया आणि आनंदात सहभागी होऊया. मोबाईलच्या स्क्रीनपेक्षा समोरच्या माणसाच्या डोळ्यांत पाहण्याची सवय पुन्हा लावूया.
नाती जपा… माणसं जपा… कारण आयुष्य संपल्यानंतर मागे राहतात त्या मालमत्ता किंवा वस्तू नाहीत; तर आपण माणुसकीने जगलेले आणि इतरांच्या मनात जपले गेलेले क्षण असतात.