महिला भाविकेची १.६५ लाखांची पर्स बसमधून शोधून खुलताबाद पोलिसांनी केली सुखरूप परत

महिला भाविकेची १.६५ लाखांची पर्स बसमधून शोधून खुलताबाद पोलिसांनी केली सुखरूप परत
महिला भाविकेची १.६५ लाखांची पर्स बसमधून शोधून खुलताबाद पोलिसांनी केली सुखरूप परत

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २५ :- श्रावणी सोमवार आणि हजरत जर जरी बक्ष उरुसानिमित्त खुलताबाद-वेरूळ परिसरात मोठी गर्दी असताना दिल्लीहून आलेल्या महिला भाविकेची बसमध्ये राहिलेली सुमारे १ लाख ६५ हजार रुपयांची पर्स खुलताबाद पोलिसांनी अथक प्रयत्नांतून शोधून सुखरूप परत केली. पोलिसांच्या या तत्पर आणि संवेदनशील कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिल्लीतील पहाडगंज येथील श्रीमती कोमल राणा या श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी वेरूळ येथे आल्या होत्या. प्रवासादरम्यान त्यांची १५ हजार रुपये रोख रक्कम आणि सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने असलेली पर्स बसमध्येच राहून गेली. विशेष म्हणजे त्यांना बस क्रमांक, चालकाची माहिती किंवा बसची ओळखही सांगता येत नव्हती. त्यांच्याकडे केवळ बसचे तिकीट हा एकमेव धागा होता.

पर्स हरवल्याने घाबरलेल्या कोमल राणा यांनी खुलताबाद पोलीस मदत केंद्र गाठले. पोलिसांनी त्यांना धीर देत पर्स शोधण्याचे आश्वासन दिले. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील यांनी तिकिटावरील माहितीच्या आधारे बसचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. बसचा मार्ग आणि दिशा शोधत पोलिसांनी ती बस कन्नडच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर चालकास तातडीने संपर्क करून बस थांबविण्याची कार्यवाही करण्यात आली.

दरम्यान, बसमध्ये कर्तव्यावर असलेल्या होमगार्डच्या सतर्कतेमुळे पर्स शोधण्यास महत्त्वाची मदत झाली. एका महिलेने पर्समधून पैसे काढण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत चालकाला बस थेट कन्नड पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले. कन्नड पोलिसांच्या मदतीने पर्स ताब्यात घेण्यात आली.

पर्समध्ये १५ हजार रुपये रोख आणि सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने सुरक्षित असल्याचे आढळले. आवश्यक खातरजमा करून संपूर्ण मुद्देमाल मूळ मालकीण श्रीमती कोमल राणा यांच्या स्वाधीन करण्यात आला. पर्स परत मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि दिलासा हा पोलिसांच्या कार्यवाहीचा भावनिक क्षण ठरला.

गर्दीत हरवलेल्या १० बालकांसह वृद्ध इसमालाही पोलिसांचा आधार

याच बंदोबस्तादरम्यान घृष्णेश्वर मंदिर आणि जर जरी बक्ष उरुस परिसरातील गर्दीत १० लहान बालके आणि १ वयोवृद्ध इसम, असे एकूण ११ जण आपल्या कुटुंबीयांपासून विभक्त झाले होते. पोलिसांनी तातडीने त्यांचा शोध घेत सर्वांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

लहान मुलांच्या बाबतीत पोलिसांनी विशेष संवेदनशीलता दाखवत त्यांच्या पालकांचा शोध घेण्यासाठी तत्काळ प्रयत्न केले. मुले सुखरूप मिळाल्यानंतर पालकांनी पोलिसांचे आभार मानले.

मोठ्या गर्दीतही कायदा-सुव्यवस्था अबाधित

श्रावणी सोमवार आणि हजरत जर जरी बक्ष उरुसाच्या पार्श्वभूमीवर घृष्णेश्वर, वेरूळ, भद्रा मारोती, खुलताबाद तसेच दर्गा परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी व्यापक बंदोबस्ताचे नियोजन केले होते.

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले. गर्दी नियंत्रण, भाविकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी विशेष दक्षता घेतली.

मोठ्या गर्दीतही कोणताही अनुचित प्रकार घडू न देता संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यात पोलिसांना यश आले. कायदा-सुव्यवस्थेसोबतच अडचणीत सापडलेल्या भाविकांना मायेचा आधार देणारी पोलिसांची ही भूमिका विशेष कौतुकास्पद ठरली आहे.