सिल्लोड तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली; २९ गावे, ५ वाड्यांना ५१ टँकरचा आधार
महाराष्ट्र वाणी
सिल्लोड, दि. १२ (प्रतिनिधी) – सिल्लोड तालुक्यात यंदा पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली असून अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे आणि जलस्रोतांतील घटत्या पाणीसाठ्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
सध्या तालुक्यातील २९ गावे आणि ५ वाड्यांमध्ये ५१ टँकरद्वारे दररोज सुमारे १०० खेपा करून पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय १५ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी १५ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांत जलसाठ्यांचे प्रभावी व्यवस्थापन न झाल्याने परिस्थिती अधिक बिकट झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. विविध प्रकल्पांमधील उपलब्ध पाणी वेळेत आरक्षित करून योग्य नियोजन केले असते, तर टंचाईची तीव्रता कमी झाली असती, असे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
विशेषतः केळगाव लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडा पडला असून, काही ठिकाणी झालेल्या अनधिकृत पाणीउपशामुळे उपलब्ध साठा झपाट्याने कमी झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित यंत्रणांनी वेळेवर कारवाई केली असती तर पाणीसंकट इतके तीव्र झाले नसते, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक आहे. खेळणा मध्यम प्रकल्पात केवळ ७.६८ टक्के, अजिंठा-अंधारी मध्यम प्रकल्पात २.७१ टक्के, चारनेर लघु प्रकल्पात १२.१ टक्के आणि निल्लोड लघु प्रकल्पात ११ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर केळगाव, उंडणगाव, रहिमाबाद आणि हळदा-जळकी हे लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत.
पाणीटंचाईची झळ दिवसेंदिवस वाढत असल्याने येत्या काळात आणखी गावांना टँकरची आवश्यकता भासण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
➖ वाचा महाराष्ट्र वाणी – आपल्या परिसरातील घडामोडींचे विश्वासार्ह व्यासपीठ!