सर्व जागांवर उमेदवार उभे करण्यास सज्ज व्हा’; उद्धव ठाकरेंचा जिल्हाप्रमुखांना स्पष्ट आदेश!
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि २१ जून :- शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुखांची महत्वाची बैठक शिवसेना भवन येथे घेतली. या बैठकीत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "वेळ आलीच तर सर्वच जागांवर लढण्याची तयारी ठेवा."
मनसेसोबत युतीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असली तरीही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास सज्ज असावा, असा स्पष्ट संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “स्थानिक पातळीवर युती किंवा आघाडी शक्य आहे का, याचा आढावा घ्या. त्या अनुषंगाने येत्या महिनाभरात अहवाल पक्षाकडे सादर करा. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.”
त्याचबरोबर त्यांनी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला — विधानसभा मतदार यादीत अचानक ४० लाख नवमतदारांची नोंद झाली आहे, त्याची तपासणी करावी, असे आदेशही गटप्रमुखांना दिले.
राज-उद्धव युतीबाबत अजूनही संभ्रम
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात युती होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "दोघे बंधू एकत्र येतील की नाही, हे ठामपणे सांगता येणार नाही. राजकारणात सगळं योग्य वेळीच घडतं."
मुख्य मुद्दे:
सर्व जागांवर लढण्यास सज्ज राहण्याचे ठाकरे यांचे आदेश
मनसेसोबत युतीसाठी चर्चेचे दरवाजे उघडे
नव्या मतदारांची नोंद संशयास्पद; तपासणीचे आदेश
स्थानिक पातळीवर युतीसाठी कार्यकर्त्यांना
आढावा घ्यायची सूचना