सईदा कॉलनीत ड्रेनेज लाईन असूनही कनेक्शन नाही; सांडपाण्यामुळे नागरिक हैराण!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १ मे :- शहरातील सईदा कॉलनी परिसरात ड्रेनेजची पाईपलाईन टाकूनही अद्याप घरांना प्रत्यक्ष कनेक्शन देण्यात आलेले नसल्याने स्थानिक नागरिकांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. सांडपाणी रस्त्यावर साचत असून परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.
विशेष म्हणजे, या साचलेल्या सांडपाण्यामुळे लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिक वारंवार नाल्यात पडत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. तसेच, नमाजासाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांनाही या समस्येमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिकांच्या मते, ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झाले असले तरी मनपाकडून घरगुती कनेक्शन देण्याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे, येथील नागरिक कनेक्शनसाठी आवश्यक शुल्क भरण्यास तयार असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
यासंदर्भात मनपा अधिकाऱ्यांनी सईदा कॉलनीला भेट देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही भेट न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या प्रभागातील नवीन नगरसेवक व प्रशासनाने तातडीने लक्ष घालून ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
👉 “आता तरी प्रशासन जागं होणार का, की सईदा कॉलनीची समस्या अशीच राहणार?”