शहरात गुटखा माफियांवर मोठी कारवाई; ७ विक्रेत्यांवर गुन्हे, लाखोंचा माल जप्त!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.१७ :- राज्यात बंदी असलेल्या गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत शहरासह जिल्ह्यात धाडसत्र राबवले. या कारवाईत तब्बल ७ गुटखा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, लाखो रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला आहे.
भेसळयुक्त आणि बंदी असलेल्या पदार्थांविरोधात कठोर भूमिका घेत प्रशासनाने शहर व ग्रामीण भागातील विविध ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. यामध्ये जुना बीड बायपास परिसरातील बेस्ट पान शॉप आणि खलील पान सेंटर, सुंदरनगर-वाघेश्वरवाडी येथील श्री चांगदेव दगडू डुबिले, बायजीपुरा-इंदिरानगर येथील शेख सुभान बानू, दौलताबाद येथील आर. आर. चिकन शॉप, एमआयडीसी वाळूज येथील धनलक्ष्मी पानशॉप तसेच पैठण येथील श्री रफीक हैदर कुरेशी यांच्या ठिकाणी कारवाई करण्यात आली.
या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला. प्रशासनाने संबंधित दुकाने व गाळे सील करत सर्व माल जप्त केला. बंदी असतानाही या पदार्थांची साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी सातही विक्रेत्यांविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
आरोपींवर BNS कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या कलम ५९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई आयुक्त एस. आर. करकाळे यांच्या नेतृत्वाखाली, सहाय्यक आयुक्त विवेक पाटील व दयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. यात वर्षा रोडे, सुलक्षणा जाधवर, ज्योत्सना जाधव, प्रज्ञा सुरसे, प्रशांत अजिंठेकर, प्रशांत कुचेकर, फरीद सिद्दीकी आणि कीर्तिका झाडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
👉 बंदी असतानाही सुरू असलेल्या गुटखा विक्रीवर प्रशासनाचा हा मोठा दणका मानला जात असून, पुढील काळातही अशा कारवाया अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत आहेत.