"लाडक्या बहिणीच्या पैशांवर ‘लाडक्या भावांचा’ डल्ला! 14 हजार बनावट लाभार्थ्यांना तुरुंगात पाठवा; अंबादास दानवेंची सरकारवर घणाघाती टीका"

"लाडक्या बहिणीच्या पैशांवर ‘लाडक्या भावांचा’ डल्ला! 14 हजार बनावट लाभार्थ्यांना तुरुंगात पाठवा; अंबादास दानवेंची सरकारवर घणाघाती टीका"

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ८ :- राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठा गैरप्रकार उघडकीस आल्याचा दावा करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तब्बल 14 हजार पुरुषांनी स्वतःला महिला लाभार्थी म्हणून दाखवत शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याचा आरोप त्यांनी केला.

दानवे म्हणाले की, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा काहींनी गैरफायदा घेतला आहे. पात्र महिलांपर्यंत लाभ पोहोचावा यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला; मात्र यंत्रणेतील त्रुटी आणि पडताळणीतील ढिसाळपणामुळे हजारो पुरुष लाभार्थी म्हणून समोर आल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.

या प्रकरणातील सर्व बनावट लाभार्थ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि शासनाची फसवणूक करणाऱ्या संबंधितांना तात्काळ तुरुंगात पाठवावे, अशी ठाम मागणी दानवे यांनी केली. तसेच या गैरप्रकारासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये अशाच प्रकारच्या अनियमितता होत असल्याचा आरोप करत दानवे यांनी म्हटले की, अनेक योजना सर्वसामान्यांच्या हितासाठी नव्हे तर काही विशिष्ट लोकांच्या फायद्यासाठी राबवल्या जात असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने लाभार्थी पडताळणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कठोर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेतील कथित गैरव्यवहारामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून, या प्रकरणावर सरकार काय भूमिका घेते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

वाचत रहा महाराष्ट्र वाणी – जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या प्रत्येक बातमीसाठी!